चंदगड : सी एल वृत्तसेवा
'शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन कसा वाढवावा' या विषयावर विजयश्री अकॅडमी कोल्हापूरचे संचालक व कालकुंद्री (ता. चंदगड) चे सुपुत्र प्रा. जॉर्ज क्रूझ यांचे मार्गदर्शन शिनोळी बुद्रुक, ता चंदगड येथे नुकतेच पार पडले. समाज मंदिर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गणपत कांबळे होते. स्वागत प्राथमिक शाळा मुख्याध्यापक आप्पाराव पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे महत्त्व, पालकांची भूमिका आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या यावर सखोल मार्गदर्शन झाले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन शालेय जीवनातच वाढवण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच आपला अभ्यास नियमित व व्यवस्थित ठेवावा तसेच स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या विविध कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासा, आत्मविश्वास, आणि तर्कशक्ती वाढवून अभ्यासात सातत्य ठेवावे. शालेय जीवनातच चांगले शैक्षणिक पाया मजबूत केल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणे सोपे जाते.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक मनोवैज्ञानिक म्हणून हाताळावे, त्यांच्या शैक्षणिक व मानसिक अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढावा असे क्रूझ यांनी सांगितले. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. असे मत व्यक्त करताना पालकांनीही आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांनी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, तसेच मुलांच्या आवडी-निवडींचा आदर करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा दीर्घकालीन असतो, त्यामुळे पालकांनी मुलांना नियमित अभ्यास करण्यासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
यावेळी उपसरपंच पुंडलिक गवसेकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन नारायण पाटील, नामदेव बोकमूरकर राजर्षी शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.टी. भाटे, आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रा. जॉर्ज क्रूझ यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद गावडे यांनी केले.
No comments:
Post a Comment