थरारक पाठलाग करून चंदगड पोलिसांनी तुर्केवाडी नजीक पकडली दिड लाखांची दारू...! - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2024

थरारक पाठलाग करून चंदगड पोलिसांनी तुर्केवाडी नजीक पकडली दिड लाखांची दारू...!



कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

     थरारक पाठलाग करून चंदगड पोलिसांनी तुर्केवाडी, ता चंदगड गावाच्या हद्दीत सुमारे 1 लाख 40 हजार 200 रुपयांची दारूसह 4,40,200 चार मुद्देमाल पकडला. गोवा बनावटीची ही दारू महाराष्ट्र राज्याचा कर चुकून विनापरवाना बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रद्युम्न यल्लाप्पा पाटील, वय 24 व लक्ष्मण सातेरी पाटील वय 54 दोघेही राहणार बहादुरवाडी तालुका जिल्हा बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्या संशयतांची नावे आहेत. 

    संशयित आरोपी आपल्या ताब्यातील होंडा कंपनीच्या सिटी झेड एक्स काळ्या रंगाच्या कार मधून गोव्यातून डीएसपी ब्लॅक व्हिस्की, ओल्ड मंक रम, इम्पेरियल ब्लू व्हिस्की, रिझर्व सेवन व्हिस्की, रॉयल चॅलेंज, अमेरिकन प्राइड विस्की, किंगफिशर बियर बॉक्स, मॅजिक मोमेंट होडका, बुलेट डबल सेवन अशा विविध कंपनीच्या लहान मोठ्या आकाराच्या बाटल्या भरून कार मधून घेऊन मोटनवाडी मार्गे कर्नाटक येथे चालले होते. मोटनवाडी नजीक सदर संशयित कार आल्यानंतर चंदगड पोलिसांनी हटकल्यावरून गाडी थांबवता अधिक वेगाने आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गाडीचा थरारक पाठलाग करत जंगमहट्टी ते तुर्केवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपींना वाहनासकट पकडले. ही घटना काल 7 सप्टेंबर 2024 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. आरोपींना त्यांच्या ताब्यातील दारू व वाहनासह एकूण 4 लाख 40 हजार 200 रुपये चा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची फिर्याद सुनील संभाजी माळी पोलीस हवालदार चंदगड यांनी चंदगड पोलिसात दिली. आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर 278/ 2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अ, ई 90, 108 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक श्रीमती धवीले या करत आहेत.

No comments:

Post a Comment