चंदगड तालुक्यात रताळी काढणीला वेग, अति पावसामुळे उत्पादनात घट, शेतकरी तोट्यात - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2024

चंदगड तालुक्यात रताळी काढणीला वेग, अति पावसामुळे उत्पादनात घट, शेतकरी तोट्यात

  


चंदगड : सी एल वृत्तसेवा

         चंदगड तालुक्याचे पश्चिमेकडील अडकूर, सातवणे परिसरात गणेश चतुर्थी नंतर रताळ्याची काढणी सुरू झाली आहे. यंदा सततच्या पावसामुळे उत्पादन मात्र घातल्याचे चित्र दिसत आहे. 

   गणेशोत्सव नंतर येणाऱ्या नवरात्र उत्सव व दसरा सणाच्या काळात  उपवासामध्ये रताळ्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे रताळ्याची चढ्या दराने विक्री होते. हा दर साधण्यासाठी शेतकऱ्यांची रताळी बाजारात पाठवण्याची घाई सुरू आहे. याची लागवड जून महिन्याच्या सुरुवातीला केली जाते. यंदा चार महिने अखंड पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रताळी उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च परवडत नाही. तुडये, माडवळे, कार्वे परिसरातील रताळी विक्रीसाठी बेळगाव मार्केटमध्ये जातात. तिथं यंदा प्रतिक्विंटल साडे तीन ते चार हजार रुपये चा दर आहे. मात्र अडकुर, सातवणे परिसरात राधानगरी, कोल्हापूर, आदमापुर या भागातील व्यापारी रताळी खरेदीसाठी दरवर्षी येत असतात. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन स्वतः खरेदी करून घेऊन जातात. 

        यावर्षी उत्पादनात घट असल्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु शेतकरी आपला माल विकण्याची विनाकारण घाई करतात. एक-दोन शेतकऱ्यांनी आपला माल कमी किमतीने दिला की तोच दर सर्वांना लावला जातो. काही शेतकऱ्यांनी प्रति क्विंटल किमान ९०० रु ऐवजी गडबड करून ६०० इतक्या कमी दराने रताळी विकल्यामुळे व्यापारी त्याच किमतीने खरेदी करू लागले आहेत. शेतकऱ्यांनाच याचा फटका बसत आहे. यासाठी शेतकऱ्यांची एकजूट  करून किंमत ठरवून विक्री करणे गरजेचे आहे. शेतकऱ्याकडून पंधरा ते वीस रुपये किलोने खरेदी केलेल्या रताळ्यांची बाजारामध्ये किरकोळ विक्री ५० रुपये प्रति किलो अशी होत असून शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होत नाही. व्यापाऱ्याला दुप्पट फायदा मिळत आहे. रताळी काढण्यासाठी  जास्त मजुरांची गरज असते, उत्पादन खर्चही जास्त असतो रासायनिक खताच्या वाढत्या किमतीमुळे ही सध्याचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यासाठी चंदगड तालुक्यात रताळ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची उभारणी करणं अत्यंत गरजेचं आहे.

No comments:

Post a Comment