तिलारी घाटाला पर्यायी 'किल्ले पारगड ते मोर्ले' रस्ता कामाला दिवाळीनंतर चा मुहूर्त....!, काम न सुरू झाल्यास दिवाळीनंतर पुन्हा आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2024

तिलारी घाटाला पर्यायी 'किल्ले पारगड ते मोर्ले' रस्ता कामाला दिवाळीनंतर चा मुहूर्त....!, काम न सुरू झाल्यास दिवाळीनंतर पुन्हा आंदोलनाचा इशारा

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   सार्वजनिक बांधकाम व वन विभागाचे अजब नियम व आडमुठ्या धोरणामुळे अर्धवट बांधकाम होऊन गेली पाच वर्षे रखडलेल्या पारगड ते मोर्ले या ८ ते ९ किलोमीटर रस्ता कामाला दिवाळीनंतर चा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. बांधकाम विभागाने निर्धारित वेळेत हे काम पूर्ण न केल्याने वनविभागाने पुढील कामास मनाई केली होती. ही बंदी उठवून मे महिन्यात वाढीव मुदत दिली असली तरी जून पासून पावसाळा सुरू झाल्याने काम होऊ शकले नाही. आता पावसाळा संपल्याने काम सुरू करण्यासाठी लागणारे सोपस्कार या महिन्यात पूर्ण करून दिवाळीनंतर बांधकाम विभागाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अशी मागणी रस्ता संघर्ष समितीचे नेते रघुवीर खंडोजी शेलार यांनी केली आहे.
       चंदगड तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असणारा किल्ले पारगड ते मोर्ले रस्ता व्हावा यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहेत. या प्रश्नी परिसरातील सुमारे पंधरा-वीस गावातील नागरिकांनी आमरण उपोषण, बेमुदत ठिय्या, धरणे, रास्ता रोको अशी ३० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. दरम्यान पाच वर्षांपूर्वी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे सपाटीकरण, मार्गावरील मोऱ्या बांधकामे आदी कामे झाली असली तरी रुंदीकरण, गटारे बांधकाम, खडीकरण, डांबरीकरण ही कामे प्रलंबित असतानाच निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्याच्या कारणास्तव वन विभागाने उर्वरित कामांवर बंदी घातली होती. त्यामुळे झालेला खर्चही वाया जाण्याची भीती होती. दरम्यान ही बंदी उठवून काम पूर्ण करावे यासाठी पुन्हा आंदोलने सुरू झाली. याची दखल घेत सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, भाजप नेते राजन तेली आदींच्या प्रयत्नातून मुदतवाड मिळाली असली तरी प्रत्यक्षात काम सुरू होणे गरजेचे आहे. याबाबत रस्ता संघर्ष समितीचा पाठपुरावा सुरू आहे. 
     हा रस्ता झाल्यास तिलारी नगर ते दोडामार्ग या धोकादायक घाट रस्त्याला तो उत्तम पर्याय ठरणार असून बेळगाव, चंदगड ते पणजी- गोवा अंतर सुमारे पंधरा ते वीस किलोमीटरने कमी होणार असून प्रवासातील धोके ९०% कमी होणार आहेत.  सध्या दोडामार्ग  घाटातील तीव्र व धोकादायक वळणांवर मोठी वाहने पडून किंवा अडकून वारंवार खंडित होणारी वाहतूक व त्यापासून प्रवासी व वाहनधारकांना होणारा मनस्ताप यापासून सुटका होणार आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात विविध कारणास्तव दोडामार्ग घाट बंद असताना सिंधुदुर्ग गोव्यात जाणारी व येणारी वाहने याच मार्गावरून ये जा करत होती. 
       या सर्व बाबींचा विचार करता वन विभागाने सध्या दिलेली मुदत पुन्हा संपण्यापूर्वी बांधकाम विभागाने लागणारे सर्व सोपस्कार पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करावी. अशी मागणी करत दिवाळी नंतर आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू न केल्यास पुन्हा आमरण उपोषण आंदोलना छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार व पारगड- मोर्ले रस्ता संघर्ष समितीने दिला आहे.

No comments:

Post a Comment