नवरात्रीत डीजे लावल्याच्या रागातून लाथा बुक्क्यांनी मारहाण...! चंदगड तालुक्यातील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2024

नवरात्रीत डीजे लावल्याच्या रागातून लाथा बुक्क्यांनी मारहाण...! चंदगड तालुक्यातील घटना

 

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

       नवरात्र उत्सवात दांडिया खेळण्यासाठी स्पीकर लावल्याच्या कारणावरून हेरे (ता. चंदगड) येथील चौघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना दिनांक ६/१०/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता घडली. याबाबत चंदगड पोलिसात दि. १३/१०/२०२३ रोजी फिर्याद दाखल झाली आहे. वंदना गुंडू नाईक, रा. हेरे यांच्या फिर्यादीवरून चंदगड पोलिसांनी सागर अर्जुन नाईक, संदीप तानाजी नाईक, सुरेखा उमाजी नाईक, शोभा संदीप नाईक सर्व राहणार हेरे यांचेवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२७(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

   याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, हेरे येथील दोन्ही कुटुंबे शेजारी राहत असून त्यांच्यात घराजवळच्या रस्त्याच्या कारणावरून वाद सुरू आहेत. त्यातच दि. ५ रोजी फिर्यादी वंदना यांचा मुलगा मयूर याने गल्लीत दांडिया खेळण्यासाठी स्पीकरवर गाणी लावून  गल्लीतील लोकांचेसह दांडिया खेळ सुरू केला. तसेच भाऊबंदातील लहान मुलांनी हट्ट धरल्यामुळे मयूर याने संशयित आरोपी सागर यांच्या गोठ्यात मुलांना नाचण्यासाठी स्पीकरवर गाणी लावून दिली. या कारणावरून सागर नाईक हा रागात होता. यावेळी दोन्ही कुटुंबात वादावादी झाले होती. दुसऱ्या दिवशी दि. ६ रोजी फिर्यादी वंदना गुंडू नाईक ही आपले पती गुंडू नाईक, मुलगा महेश व मयूर आपल्या घराशेजारी जनावरांच्या गोठ्याजवळ थांबले असता आरोपींनी मयूर यास 'तू रात्री आम्हाला विचार न विचारता साऊंड सिस्टीम का लावलास?' असे विचारत मारहाण सुरू केली.  वरील चौघांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली यात वंदनाचे बोट फ्रॅक्चर झाले तर मुलगा महेश हा जखमी झाला. यानंतर  आरोपी सागर याने पुन्हा धमकी दिल्याने वैद्यकीय प्रमाणपत्र हजर करत १३ रोजी पोलिसात फिर्याद दिली. याबाबतचा रिपोर्ट पोलीसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंदगड कोर्ट यांचे न्यायालयात पाठवला असून पोलीस निरीक्षक विश्वास पाटील स्वत: व सहायक फौजदार एस. एम. कोगेकर अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment