दुर्गसंवर्धन मोहीम अंतर्गत 'किल्ले भुदरगड' वर स्वच्छता मोहीम, सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम....! - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2024

दुर्गसंवर्धन मोहीम अंतर्गत 'किल्ले भुदरगड' वर स्वच्छता मोहीम, सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम....!

 


गारगोटी : सी एल वृत्तसेवा 

    सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण करताना ते अधिक भक्कम करण्यासाठी स्वराज्यात सुमारे ३५० किल्ले बांधले. हे एक जागतिक रेकॉर्ड आहे. तथापि काळाच्या ओघात शिवराय व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे ज्वलंत साक्षीदार असलेले हे गडकोट दुर्लक्षित झाल्यामुळे अखेरची घटका मोजत आहेत. हा ठेवा जतन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग सेवक गेल्या काही वर्षांपासून आपला अमूल्य वेळ व श्रमदानातून पदर मोड करून दुर्गसंवर्धन मोहीम चालवत आहेत.

    यंदा विजयादशमी दसऱ्याच्या शुभप्रसंगी प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय पुरातत्त्व विभागाच्या संमतीने मराठ्यांच्या देदित्यमान इतिहासाचे साक्षीदार असलेल्या राज्यभरातील गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेऊन यशस्वी केली. या मोहिमेमुळे  झाडे झुडपे व कचऱ्याच्या विळख्यात हरवलेल्या गडकोटांनी मोकळा श्वास घेतला.

   या मोहिमेंतर्गत अन्य किल्ल्यांबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व सह्याद्री प्रतिष्ठानने बसवलेल्या तोफगाड्याचे पूजन करून मोहिमेस सुरुवात झाली. मोहिमेत गडावरील प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच गडावर येणाऱ्या पर्यटकांना दुर्गसंवर्धन मोहीम संबंधी माहिती दिली. तटबंदीवर उगवलेली झाडेझुडपे काढून टाकली. गडावरील पुरातन मंदिर व वास्तूंची स्वच्छता करण्यात आली. याकामी राज्य पुरातत्व विभागाचे  सहसंचालक डॉ विलास वहाणे यांचे सहकार्य लाभले. यावेळी दुर्गसेवक शिवलिंग तेली यांनी मोहिमेविषयी माहिती दिली. पवन माणगावकर, शुभम कल्याणकर, आशिष  शेणवी, ओम राणे यांच्यासह  भुदरगड  पायथ्याला असलेल्या सोनारवाडी गावातील दुर्गसेवक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोहिम प्रमुख अक्षय माणगावकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment