चंदगड / प्रतिनिधी
कॉलेजच्या मुलींनी जागरूकता बाळगून कोणत्याही मोहाला बळी न पडता दक्ष राहून आपल्या सुरक्षितेची काळजी घ्यावी असे मत चंदगड येथील ॲड. अमृता शेरेगार यांनी केले. त्या येथील र. भा माडखोलकर महाविद्यालयातील अंतर्गत ``तक्रार निवारण समिती`` विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
ॲड. शेरेगार आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, ``आजच्या काळात मुलींनी स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवी. आपली वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर अजिबात शेअर करू नये, मोबाईलच्या आहारी जाऊ नये. आपल्या हातून कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी ॲड. विजया आजरेकर यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा, पोक्सो कायदा, सायबर गुन्हा याची सविस्तर माहिती देऊन प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थिनींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ॲड. आजरेकर व ॲड. शेरेगार यांनी दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ॲड. आर. पी. बांदिवडेकर म्हणाले की, ``मुळात आपल्यावर अन्याय घडूच नयेत याची दक्षता आपण घेतली पाहिजे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य डॉ. गोरल यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी जागरूक राहणे गरजेचे असून आपली काळजी घेऊन स्वतःचे करिअर उज्वल करावे असे आवाहन केले.
तक्रार निवारण समितीच्या समन्वयक प्रा. सौ. सरोजिनी दिवेकर यांनी या समितीमार्फत चाललेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन दिपाली पाटील हिने तर आभार डॉ. आर. के. कमलाकर यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा. एस. एम. पाटील, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एन. के. पाटील, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. ए. पी. पाटील, प्रल्हाद कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment