माडखोलकर महाविद्यालयाच्या 'वाचाल तर वाचाल' या परिसंवादावेळी बोलताना प्रा. ए. डी. कांबळे
चंदगड / प्रतिनिधी
"व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा, साहित्य,नाट्य, संस्कृती, वैचारिक असे चौफेर वाचन केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील ग्रंथालय माहिती केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या 'वाचाल तर वाचाल' या परिसंवादात साधनव्यक्ती म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ``वर्तमानपत्रातील अग्रलेख आणि वैचारिक लेख आवर्जून वाचले पाहिजेत. वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण बनते . डॉ. आंबेडकर, माजी राष्ट्रपती कै ए. पी. जे. अब्दुल कलाम, कै. रतन टाटा, विनोबा भावे, म. गांधी, लोकमान्य टिळक सारखे अनेक दिग्गज व्यक्तीमध्ये घडली ती वाचन संस्कृतीमुळे ! वाचनामुळे माणसाला वर्तमान जगाचे अद्ययावत ज्ञान प्राप्त होते. तसेच बुद्धी बरोबर भावनेचाही विकास होतो. विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी चरित्रे व निवडक ग्रंथांचे वाचन करून आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध केले पाहिजे.``
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनीविद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या चरित्रांचे आवर्जून वाचन केले पाहिजे व प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी जिद्दीने ज्ञानाची कास धरली पाहिजे असे मत व्यक्त केले . प्रास्ताविकात ग्रंथपाल रा. सु. गडकरी यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे ज्ञान तसेच अवांतर ज्ञान आत्मसात करण्यासाठी ग्रंथालयातील ग्रंथसंपदेचा सदुपयोग करावा असे आवाहन करतानाच आजच्या माध्यमक्रांतीच्या युगातही पुस्तकांचे कसे महत्त्व आहे हे विशद केले. ग्रंथालयातील विद्यार्थी हितासाठी खरेदी करण्यात येत असलेली ग्रंथसंपदा, नियतकालिके, वर्तमानपत्र यांची माहिती दिली तसेच करिअर घडवू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना ग्रंथालय सर्वतोपरीसहकार्य करेल असे आश्वासन दिले. प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन, भाषण, श्रवण ही मूलभूत कौशल्ये प्राप्त करून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. तसेच आपले ज्ञान आजच्या युगात अद्ययावत ठेवण्यासाठी निवडक साहित्यकृतींच्या बरोबर वैचारिक वाङमयाचे, नियतकालिकांचे नियमाने वाचन केले पाहिजे असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन रा. सु. गडकरी यांनी केले. आभार प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. राहुल पाटील, अनिल पाटील, प्रा. मयुरी कांडर, प्रा. बी. एम. पाटील, प्रा. आर. एस. पाटील, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment