शिवसेनेच्या चंदगड, आजरा तालुकाप्रमुखांसह विभाग व शाखाप्रमुखांच्या राजीनामा सत्रामुळे खळबळ - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2024

शिवसेनेच्या चंदगड, आजरा तालुकाप्रमुखांसह विभाग व शाखाप्रमुखांच्या राजीनामा सत्रामुळे खळबळ

 

कोवाड येथे राजीनामा संबंधी घेण्यात आलेल्या परिषद प्रसंगी उपस्थित शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख उपप्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांतील अंतर्गत कुरघोडीमुळे आपली घुसमट होत आहे. तसेच प्रत्येक वेळी उपऱ्या उमेदवारांच्या सतरंज्या उचलणे, वरिष्ठ स्तरावरून अपमानीत व दुर्लक्षित होत असल्याच्या कारणावरून चंदगड तालुक्यातील दोन तालुकाप्रमुख लक्ष्मण शिवाजी मनवाडकर व अनिल दळवी तसेच आजरा तालुकाप्रमुख राजेंद्रसिंह नारायणराव सावंत यांच्यासह तालुक्यातील विभाग प्रमुख, महिला आघाडी, बांधकाम कामगार संघटना व अनेक शाखाप्रमुखांनी आपले राजीनामे देत असल्याची माहिती कोवाड (ता. चंदगड) येथे (दि. २८) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजीनामा सत्रामुळे महाविकास आघाडी खळबळ उडण्याची शक्यता आहे. या डॅमेज कंट्रोल साठी शिवसेना जिल्हा व राज्यस्तरावरील पदाधिकारी काय उपाययोजना करतात याकडे मतदारसंघातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

      चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांतील अंतर्गत कुरघोडी सर्वश्रुत आहे. प्रसार माध्यमांकडे राजीनामे सादर करताना गेली कित्येक वर्षे पक्षाशी प्रामाणिक राहून शिवसैनिक म्हणून प्रामाणिक व निष्ठावंत असतानाही गटबाजीमुळे होत असलेली नाहक बदनामी संताप जनक आहे. उद्धव ठाकरे यांच्या यांचा आदेश पालन करताना सर्व जबाबदाऱ्या पदरमोड करून पार पाडल्या. शिंदे यांच्यावेळी पक्ष फुटी नंतरही निष्ठेने सोबत राहून कामे केली. महाविकास आघाडी शासन काळात आमच्याच मंत्र्यांकडे किरकोळ कामे घेऊन गेले तर  कामे करण्याचे किंवा चांगले बोलणे दुरच, उलट अपमानित होऊन बाहेर पडावे लागले. जिल्हा, उपजिल्हाप्रमुख व इतर वरिष्ठ यांच्यातील गटबाजी, दरवेळी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत उपऱ्या, पैसेवाल्या उमेदवारांच्या पालख्या वाहने सतरंज्या उचलण्यापलीकडे शिवसैनिकांना दुसरे काही काम राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व विधानसभेला राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार शिवसैनिक स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून करतात. नंतर मात्र शिवसैनिकांना स्व पक्ष व तथाकथित मित्र पक्ष यांच्याकडून सोयीस्कर रित्या वाऱ्यावर सोडले जाते. किंवा आमची मदत घेतलेले लोक पुन्हा विचारतही नाहीत. हे गेली तीस वर्षे सुरू आहे. या सर्व गोष्टी सहनशीलतेच्या पलीकडे गेल्या आहेत. पक्षप्रमुख सांगतील त्या उमेदवारांचा प्रचार आम्हाला आमच्याच खिशातून खर्च करून करावा लागतो. मात्र निवडून आल्यानंतर हे उपरे शिवसैनिकांना संपवण्याच्या प्रयत्नात असतात. या सर्व बाबींमुळे झालेली घुसमट व कामाचा आलेला तिटकारा यामुळे आम्ही पदांचे राजीनामे देत आहोत. असे पत्रकार परिषदेच्या वेळी सांगून राजीनामा पत्रे माध्यम प्रतिनिधींकडे दिली. ही सर्व पत्रे उद्या वरिष्ठांकडे देणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना चंदगड तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर, उप तालुकाप्रमुख रवींद्र पाटील व विनोद पाटील, विभाग प्रमुख संदीप पाटील, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ गुलाबी शिंदे, विभाग प्रमुख अर्चना कांबळे, लीला कडोलकर, बांधकाम संघटना उपतालुकाप्रमुख विलास बिर्जे, आदींसह चंदगड तालुक्यातील सुमारे २५ गावातील शाखाप्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment