तिलारी घाटात रास्ता रोको आंदोलन...! घाटातून एसटी सुरू करण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2024

तिलारी घाटात रास्ता रोको आंदोलन...! घाटातून एसटी सुरू करण्याची मागणी

 

तिलारी घाटातून एसटी वाहतूक सुरू करावी या मागणीसाठी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांची समजूत काढताना पोलीस व अन्य प्रशासकीय अधिकारी

चंदगड : सी एल वृत्तसेवा

      गेल्या १ जुलै पासून तिलारी ते दोडामार्ग घाटातून सुरू असलेली एसटी वाहतूक बंद आहे. परिणामी बस वर अवलंबून असणाऱ्या मार्गावरील गरीब ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. एसटी सुरू करावी या मागणीसाठी चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील विविध गावचे सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर समोर आमरण उपोषण सुरू केले होते. तेव्हा एसटी सुरू करण्याचे आश्वासन देऊन उपोषणकर्त्यांना परावृत्त करण्यात आले होते. 

        चार दिवसांपूर्वी प्रशासनामार्फत घाटातील रस्त्याची पाहणी केली असता, हे प्रवाशांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी केवळ नाटक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. पाहणी साठी आलेले अधिकारी एसटी सुरू होणार नाही अशा प्रकारचा अहवाल देणार, अशी तेव्हाच ग्रामस्थांनी उपस्थित केलेली शंका खरी ठरली. आठ दिवस झाले तरी एसटी सुरू न झाल्यामुळे संतापलेल्या प्रवासी व ग्रामस्थांनी आधी इशारा दिल्या  प्रमाणे काल दि. १५ रोजी तिलारीनगर येथे उस्फूर्त रास्ता रोको केला. यामुळे घाटात वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. येथील वाहतूक अर्धा दिवस ठप्प झाली होती.

     रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याचे समजतात विभागाचे मंडल अधिकारी राजश्री प्रचंडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला आदी अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. तथापि आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांनी १ जुलै रोजी काढलेल्या आदेशाची प्रत त्यांच्यासमोर झळकावली. यात  सुरक्षेच्या कारणास्तव १ जुलै ते ३१ ऑक्टोबर पर्यंत लहान- मोठ्या व अवजड अशासर्व प्रकारच्या वाहनांसाठी घाटातून वाहतुकीस बंदी घालण्यात आल्याचे निदर्शनास आणले. असे असताना प्रत्यक्षात मात्र एसटी वगळता सर्व प्रकारची शेकडो वाहने रोज घाटातून कशी धावत आहेत? या बेकायदा वाहतुकीला कोणाचा आशीर्वाद आहे? असा सवाल करत अधिकाऱ्यांना निरुत्तर केले.

    बंदी आदेशामुळे कोल्हापूर, राधानगरी, गारगोटी, चंदगड, गडहिंग्लज, बेळगाव येथून दोडामार्ग व गोवा राज्यात जाणाऱ्या एसटीच्या अनेक फेऱ्या थांबल्या. परिणामी केवळ एसटीवर अवलंबून असणारे व्यापारी, रुग्ण, विद्यार्थी, गरीब चाकरमानी व मजूर यांची चार महिने कोंडी झाली आहे. 

      एकंदरीत एसटी पेक्षा दुप्पट तिप्पट वजनाची वाहने घाटातून राजरोस धावत आहेत पण चाळीस वर्षांपूर्वी आत्ता पेक्षा कमी रुंदीचा रस्ता व धोक्याची वळणे होती तेव्हा सुरू असलेली एसटी सध्या रस्त्याची रुंदी वाढलेली असतानाही बंद करणे चुकीचे आहे. असे म्हणत सर्वसामान्य नागरिकांनीही आंदोलकांनात सक्रिय सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment