बैलगाडा शर्यत आयोजकांवर गुन्हा दाखल, चंदगड तालुक्यात खळबळ....! - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2024

बैलगाडा शर्यत आयोजकांवर गुन्हा दाखल, चंदगड तालुक्यात खळबळ....!

 

बैलगाडा शर्यत - संग्रहित छायाचित्र
चंदगड : सी एल वृत्तसेवा
    एकीकडे महाराष्ट्र शासनाने बैलगाडा शर्यतीला मान्यता दिल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे चंदगड तालुक्यात पोलिसांनी बैलगाडा शर्यत आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर गायकवाड यांनी चंदगड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शर्यत आयोजक व सहभाग घेतलेल्या सखाराम गणपती राऊत, राजू जोतिबा शिंदे, बाबू विठ्ठल गुरव, मीनाजी डुगोबा जाधव, मारुती गोपाळ कुट्रे सर्व राहणार जंगमहट्टी, ता. चंदगड यांच्यासह अन्य १० ते १५ अनोळखी इसमांवर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेमुळे चंदगड तालुका शर्यत आयोजक व बैलजोडी मालकांत एकच खळबळ उडाली आहे.
   याबाबतच्या गुन्ह्याची चंदगड पोलिसातून मिळालेली संक्षिप्त माहिती अशी, वरील पाच संशयित आरोपींनी संगणमत करून जंगमहट्टी गावाचे हद्दीत धरणा जवळील गायरान हद्दीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.  यावेळी इतर दहा पंधरा अनोळखी आरोपींनी सदर बैलगाडा शर्यतीत बैलजोडी व गाडीसह सहभाग घेऊन शर्यतीमध्ये आपला नंबर यावा या उद्देशाने मुक्या प्राण्यांना चाबुक व काठीने मारहाण करून निर्दयपणे वागणूक दिली. शर्यत पाहण्याकरिता आलेल्या लोकांच्या जीवितास धोका होईल अशा रीतीने बैलगाड्या पळवून  अप्पर जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर यांनी राजकीय आंदोलनाच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या आदेशाचा भंग करून पोलिसांनी दिले सूचना कडे दुर्लक्ष करून बेकायदा व बिगर परवाना बैलगाडी शर्यत घेतली. असा आरोप आहे. ही घटना 5 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी बारा वाजताचे सुमारास घडली. यावरून संशयित आरोपींवर त्याच दिवशी रात्री 10 वाजून 47 मिनिटांनी गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 189 (2), 223 सह प्राण्यांना क्रुरतेने व निर्दयतेने वागवणेस प्रतिबंध करणे बाबतचा अधिनियम 1960 चे कलम 11 (1) आ, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119, 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस पथक करत आहे.


No comments:

Post a Comment