चंदगड येथे अर्ज भरताना संभाजी ब्रिगेडचे उमेदवार परशराम उर्फ प्रशांत कुट्रे, सोबत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी.
चंदगड : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व संभाजी ब्रिगेडची एक वर्षापासून म्हणजेच गेल्या लोकसभा निवडणुकीपासून असलेली युती विधानसभा निवडणुक जागा वाटपात संभाजी ब्रिगेडला योग्य वाटा न मिळाल्यामुळे मागील आठवड्यात तुटली. यानंतर संभाजी ब्रिगेडने राज्यभर आपल्या पक्षाचे ५० उमेदवार उभे केले आहेत. या सर्व उमेदवारांना मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन प्राप्त असल्याचे सांगितले जाते.
मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड पक्षाने २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघातही आपला उमेदवार दिला आहे. या पक्षाकडून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे माजी चंदगड तालुकाध्यक्ष व विद्यमान कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष परशराम उर्फ प्रशांत पांडुरंग कुट्रे (रा. केंचेवाडी, ता. चंदगड) यांनी काल उमेदवारी अर्ज भरला असून तो छाननी मध्ये टिकला आहे. कुट्रे यांना मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, शिक्षक परिषद, शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषद अशा ३३ कक्षातील कार्यकर्त्यांचे बळ तसेच सकल मराठा समाज व मराठा आरक्षण समिती मनोज जरांगे यांच्या विचाराच्या मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे.
उमेदवारी अर्ज भरताना सोमवारी चला लढूया- छत्रपती शिवरायांचे रयतेच राज्य आणुया, इडा पीडा टळू दे- बळीचे राज्य येवू दे, लडेंगे और जितेंगे- हम सब जरांगे, एक मराठा- लाख मराठा अशा घोषणा देत समर्थकांसह उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कुट्रे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराने मराठा आरक्षण व शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment