कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
'२७१ चंदगड विधानसभा' मतदारसंघातील तरुण, तडफदार अपक्ष उमेदवार तुलसीदास लक्ष्मण जोशी यांना रघुनाथदादा पाटील यांच्या मूळ शेतकरी संघटनेने पाठिंबा दिल्यामुळे तुलसीदास जोशी यांना या निवडणुकीत मोठी कुमक मिळाली आहे.
गेली ४० वर्षे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून ऊसाला योग्य भाव मिळवून देणारे नेते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील हे वाळवा इस्लामपूर मधून जाहीर सभेच्या निमित्ताने प्रथमच कालकुंद्री गावात आले. अपक्ष उमेदवार तुलसीदास जोशी यांची शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न, तसेच महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतची त्यांची तळमळ पाहून अपक्ष म्हणून चंदगड विधानसभा निवडणूक लढवणारे तुळशीदास जोशी यांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यामुळे महाराष्ट्राचा विकास खुंटून राज्य भकास व्हायला वेळ लागणार नाही. कोणतीही गोष्ट फुकट देण्यापेक्षा महिला व तरुणांना रोजगार द्या. मुलाला पन्नास हजारांची नोकरी मिळाली तर आईला पंधराशे रुपये देण्याची नामुष्की कुठल्याही सरकारवर ओढवणार नाही. दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला १० हजार मिळणारा दर सध्या ३ ते ४ हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. तर ३०० रुपयाला मिळणाऱ्या ५० किलो खताच्या पिशवीचा दर सतराशे पर्यंत गेला आहे. हीच मोदीची गॅरंटी काय? असा सवाल करत अशा शेतकरी, महिला व बेरोजगार तरुणांच्या विरोधी भाजप युती सरकारला हद्दपार केलेच पाहिजे. त्यासाठी आपल्या हक्काचा उमेदवार तुलसीदास जोशी यांनाच आपले बहुमोल मत देऊन विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उमेदवार तुलसीदास जोशी म्हणाले आपले व्हिजन हे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवणे, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तरुणांना नोकऱ्यांची संधी मिळेल असे उद्योग येथील एमआयडीसी मध्ये आणणे, त्यांना उद्योग व्यवसायात सहकार्य करणे, क्रीडा क्षेत्राला वाव देऊन ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू मतदारसंघातून तयार करणे हे आपले स्वप्न आहे असे सांगितले. महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले तर त्या महिन्याला ३० हजार सुद्धा कमावतील. असे सांगत सध्याच्या शासनाने घेतलेल्या महाराष्ट्र विरोधी अनेक निर्णयावर टीका केली. या भ्रष्ट सरकार व त्यातील भ्रष्ट नेत्यांच्या भुलथापांना बळी न पडता माझ्या 'बासरी' या ११ नंबरच्या निशाणी समोरचे बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे. असे आवाहन केले.
यावेळी करवीर मतदार संघातील शेतकरी संघटनेचे उमेदवार ॲडव्होकेट माणिक शिंदे, वाळवा तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांची भाषणे झाली. यावेळी स्टेजवर माजी कुस्तीगीर मारुती तेऊरवाडकर, शंकर सांबरेकर, तुकाराम जोशी, रामचंद्र जोशी यांच्यासह महिला, तरुण व शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक कालकुंद्री येथे झालेल्या जाहीर सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कोले यांनी केले. उमेदवार तुलसीदास जोशी यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment