चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील) यांच्या वतीने संघटनेचे चंदगड तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक ड्युटीवरील सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी सुट्टी द्यावी. अशी मागणी तहसीलदार चंदगड यांच्याकडे केली आहे.
८ नोव्हेंबर २०२४ रोजी चंदगडचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण साहेब यांची भेट घेऊन १९ व २० नोव्हेंबर २०२४ रोजी चंदगड तालुक्यातील बहुतांशी शिक्षक व विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी निवडणूक ड्युटीवर आहेत. यांची नेमणूक जिल्ह्यातील विविध दूरवरच्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे उशिरापर्यंत निवडणूक कामकाज चालणार आहे. चंदगड सारख्या दुर्गम ठिकाणी कर्मचाऱ्यांना रात्री परतीचा प्रवास करण्यास अशक्य असणार आहे. काही वेळेला दिवसभरातील ताण तणाव व अंतर या कारणाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच रात्री उशिरा परतीच्या वेळी वाहन चालवण्याच्या दृष्टीने ही घातक असल्याचे यावेळी संघटनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना सांगण्यात आले. यामुळे निवडणुकीच्या दिवशी होणाऱ्या कामकाजातील ताण तणाव आणि दूरवरचा प्रवास या कारणाने दिनांक २१ रोजी वेळेत शाळेवर पोहोचणे कर्मचाऱ्यांच्या समोर आव्हान असणार आहे. त्यादिवशी जरी कर्मचारी कामावर उपस्थित झाले तरी त्यांच्या मानसिक व शारीरिक थकव्याच्या कारणाने त्यांना त्यादिवशी आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सुट्टी द्यावी अशी विनंती करण्यात आली. यावेळी शिवाजी पाटील यांच्यासोबत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment