चंदगड (प्रतिनिधी) :
चिकाटी, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही आयुष्यात हवं ते मिळवू शकता. त्यासाठी चांगलं शिक्षण, अचूक व्यासपीठ आणि योग्य दिशा मिळणं महत्वाचं असतं. असं असलं तरी त्याला केवळ तुम्ही स्वतः जबाबदार नाही तर त्याला तुमच्या आजूबाजूची परिस्थिती देखील कारणीभूत असते. ही परिस्थिती बदलण्याची ताकद त्या ठिकाणच्या राजकीय नेतृत्वामध्ये असते. मात्र, चंदगड मतदारसंघात बिकट परिस्थिती असून त्याला कारणीभूत आजपर्यंतचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल, चांगले शिक्षणिक वातावरण, चांगले उद्योग, व्यवसाय आणि रोजगार यायचे असतील तर नेतृत्व बदलण्याची गरज आहे. ते फक्त आणि फक्त तुम्ही करू शकता. त्यासाठी हीच सुवर्ण संधी आहे, तुम्ही एकत्र या योग्य उमेदवार निवडा. त्यामाध्यमातून तुम्ही मला एक संधी द्या, इथली बेरोजगारी पहिल्या टप्प्यात मिटवून दाखवतो. त्यासाठी भरघोस मतदान करा असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी केले. हलकर्णी कारखाना स्थळावर आयोजित युवा मेळाव्यात तरुणांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
'प्रत्येक घरात एक नोकरी' देऊ
खोराटे पुढे म्हणाले, ``आज आपल्या सर्वांची शेतीवाडी आहे. पण ती खूप छोट्या स्वरूपात आहे. त्यावर आपलं घर चालतं पण आपली प्रगती होऊ शकत नाही. त्यासाठी रोजगार, उद्योग निर्माण होणं गरजेचं आहे. त्यासाठी रोजगार मेळाव्यातून काही प्रमाणात नोकऱ्या देण्याचा मी प्रयत्न केला. खरं तर नोकऱ्या देण्याचं काम सरकारचं असून त्यासाठी लोकप्रतिनिधीने प्रयत्न करायचे असतात. पण आपले नेतृत्व तितकं सक्षम नाही. त्यासाठी मला राजकीय पाठबळ हवं आहे. त्यासाठी तुम्ही मला आमदार करा, मी नक्की 'प्रत्येक घरात एक नोकरी' देईन. त्यासाठी माझी सर्व भिस्त ही तरुणाईवर आहे. तुमच्यात ती ताकद आहे, तुम्ही खऱ्या अर्थाने देशाचं आणि चंदगड मतदारसंघाचे भविष्य आज तुमच्या हातात आहे. तुम्ही नक्की माझ्या पाठीशी राहाल आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नारळाची बाग या चिन्हावर निवडून द्याल ही मला खात्री असल्याचं मत खोराटे यांनी व्यक्त केली.
विचार करा तुमच्या भविष्याचा, विचार करा तुमच्या आई वडिलांचा, विचार करा तुमच्या नोकऱ्यांचा, तुमच्या उद्योग धंद्यांचा, तुमच्या उज्जवल भविष्याचा आणि खोराटे यांना निवडून द्या असं आवाहन ॲड. संतोष मळविकर यांनी केले.
तुमच्या आमच्या भविष्यासाठी खोराटे यांना आमदार करण्याची गरज
आज चंदगड मतदारसंघात युवा पिढीच्या हाताला काम नाही, त्यांच्यासाठी चांगल्या शिक्षणाच्या सोयी नाहीत. त्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ नाही किंवा त्यांच्या कौशल्याला पाठबळ मिळवून देण्यासाठी उद्योग स्नेही वातावरण नाही. त्यामुळेच आज तुमच्या आमच्यासाठी मानसिंग खोराटे यांना विधानसभेत पाठवून आमदार करण्याची खरी गरज असल्याचे मत विश्वनाथ ओऊळकर, उदय पाटील यांच्यासह तरुण कार्यकर्त्यांनी केले.
यावेळी ॲड. संतोष मळविकर, जगन्नाथ हुलजी, आर. आय पाटील, नवनीत पाटील, बाळासाहेब हळदणकर, विश्वनाथ ओऊळकर, उदय पाटील, सुनील शिंदे, सुनील नाडगौडा यांच्यासह तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्रू लाड यांनी केले तर आभार सुनील शिंदे यांनी मानले.
No comments:
Post a Comment