तेऊरवाडी /सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तत्पूर्वी कर्नाटकातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील शेतकरी बांधवांनी कर्नाटकातील कारखान्यांना ऊस घालण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी केले आहे.
प्रा. पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, सध्या साखर कारखान्यांच्या टोळ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागामध्ये उतरून ऊसतोड करत आहेत. पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कर्नाटकातील साखर कारखान्याच्या ऊसतोडी घेऊ नयेत. कर्नाटकातील साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांपेक्षा कमी दर देतात. त्यांच्या वजनामध्ये पारदर्शकता नसते. पहिली उचल दिल्यानंतर दुसऱ्या हप्त्याची मागणी करता येत नाही. आपल्या भागातील साखर कारखान्यांचे गळीत चांगल्याप्रकारे झाले पाहिजे, तरच त्यांच्याकडे जादा दराची मागणी करता येते. तरी उत्पादकांना कर्नाटकची ऊसतोड घेण्याची घाई करू नये. जो कारखाना अधिक दर देतो त्या कारखान्याच्या ऊस तोडी घ्याव्यात. उपविभागातील सर्व साखर कारखाने सुरू होणार आहेत. उसाचे क्षेत्र आणि सरासरी उतारा कमी आहे. त्यामुळे १५ मार्चपर्यंत यावर्षीचा हंगाम चालेल. त्यामुळे उत्पादकांनी घाई करू नये, असेही आवाहन केले.
No comments:
Post a Comment