बेळगाव येथे मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना सदाशिव पाटील व कुटुंबीय. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
२४ तास जहाल विषारी सापांशी खेळत पदरमोड करून समाजसेवा करणाऱ्या ढोलगरवाडी येथील सर्प शाळा प्रमुख प्राध्यापक सदाशिव पाटील यांना नुकताच ' नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन- बेळगाव' या संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या ४० वर्षात सदाशिव पाटील यांनी मनुष्य वस्तीत घुसलेल्या सुमारे साडेपाच हजार पेक्षा अधिक विषारी व बिनविषारी सापांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे कार्य केले. पर्यावरण साखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या सापांविषयी त्यांनी केलेले हे उत्तुंग कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. एका अर्थाने त्यांनी पर्यावरण संतुलन राखण्यात आपली मोठी भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर ढोलगरवाडी येथील सर्प शाळेत काम करताना येथे रोज भेट देणाऱ्या पर्यटक, डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक, पोलीस, आर्मी चे जवान, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, संशोधक यांना निस्वार्थी भावनेने कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न बाळगता केलेले मार्गदर्शन केले आहे. चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी या आपल्या गावात अनेक वर्षे तंटामुक्त कमिटी अध्यक्ष असताना बिनविरोध केलेल्या अनेक निवडणुका, सर्पदंश झालेल्या अनेक रुग्णांना केवळ धीर देऊन त्यांचे वाचवलेले प्राण या सर्वांचा विचार करून त्यांना या संस्थेने हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. नुकताच त्यांनी हा पुरस्कार सपत्नीक स्वीकारला. यावेळी त्यांचे कुटुंबीय व मित्र मंडळ उपस्थित होते.
दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यातील निवडक व्यक्तींना या पुरस्काराने यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment