वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो - प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे ग्रंथदान कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2024

वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो - प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे ग्रंथदान कार्यक्रम

 


चंदगड / प्रतिनिधी

       "वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. विचारांची देवाण घेवाण होऊन विधायक बदल घडविण्याची प्रेरणा मिळते. पुस्तकांची मैत्री निर्भिडपणे जगण्याची ताकद देते. यासाठी वाचनाची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे. वाचन संस्कृती ही केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर विचारांचा विस्तार आणि मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाचा शोध घेण्याची प्रक्रिया आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाचे महत्त्व घटते आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने वाचनाची जागा झटपट माहितीने घेतली आहे. परंतु त्या झटपट माहितीचा गाभा किती अर्थपूर्ण आणि विचारशील आहे, हे तपासणे आवश्यक आहे. वाचनाचा अस्सल अनुभव हा केवळ किती पुस्तके वाचली यावर अवलंबून नसतो, तर वाचलेल्या पुस्तकांमधील विचारांचे अनुसरण किती काळ टिकते, यावर तो अवलंबून असतो असे प्रतिपादन डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे ग्रंथदान कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन. डी. देवळे होते. यावेळी प्राचार्य देवळे म्हणाले की,"वाचन हे केवळ विद्या अर्जनाचे साधन नाही, तर ते व्यक्तीला आत्मज्ञान आणि आत्मपरीक्षणाच्या दिशेने नेणारे शक्तिशाली माध्यम आहे. समाजाच्या विचारशीलतेचा पाया मजबूत करण्यासाठी डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या ग्रंथदान उपक्रमाने या विचाराच्या मुळाशी एक नवा आदर्श निर्माण केला आहे."

       यावेळी डॉ. चंद्रकात पोतदार यांनी शाळेला ५५ पुस्तकांचा संच भेट दिला. यावेळी ग्रंथपाल शरद हदगल यांनी ग्रंथ प्रदर्शन भरविले होते. कार्यक्रमाला टी. एस. चांदेकर, बी. आर. चिगरे, टी. टी. बेरडे, डी. जी. पाटील, जे. जी. पाटील, टी. व्ही. खंदाळे, पुष्पा सुतार, वर्षा पाटील व अध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. व्ही. कानूरकर तर आभार संजय साबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment