चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड पोलिसांनी आज दि ८/११/२०२४ रोजी पहाटे २.१५ च्या सुमारास (७ रोजी रात्री) गवसे, ता. चंदगड येथे छापा टाकून कर चुकवून बेकायदेशीरपणे आणलेला ६ लाख ४८० रुपयांचा मद्य साठा जप्त केला. ही गोवा बनावटीची दारू गोव्यातून आणून साठा करणारा दशरथ अर्जुन सावंत, वय ४८ राहणार गवसे, ता. चंदगड याच्यासह त्याला ही दारू आणून देण्यासाठी मदत करणारा प्रदीप पाटील रा. सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या दोघांवर चंदगड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ इ ९०, १०८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद युवराज पाटील पोलीस कॉन्स्टेबल चंदगड यांनी पोलिसात दिली आहे.
याबाबतची हकीकत अशी, दशरथ याचेकडे प्रदीप पाटील याने आपल्याकडील स्विफ्ट व स्कार्पिओ कारमधून महाराष्ट्र राज्याचा कर चुकवण्याच्या उद्देशाने गोवा राज्यातून गोवा बनावटीची दारू विक्री करण्यासाठी आणून दिली होती. तर आरोपी दशरथ सावंत याने या दारूचा साठा विक्रीसाठी आपल्या कब्जात बिगर परवाना व बेकायदेशीर रित्या बाळगला होता. पोलिसांनी छापा टाकून गुरुवारी रात्री सव्वा दोन वाजता पकडला. दशरथ याने हे बेकायदेशीर दारू बॉक्स गवसे येथील आपल्या राहत्या घराच्या पुढे असलेल्या गोठ्याच्या पाठीमागे उघड्यावर ठेवला होते. यात रॉयल ग्रँड व्हिस्की 12 बाटल्या किंमत 7800, गोल्डन आईस ब्ल्यू व्हिस्की मोठ्या 792 बाटल्या किंमत 2 लाख 36 हजार 160 तर छोट्या बाटल्या 864 किंमत 99,360, गोल्डन आईस ब्ल्यू फाईन रम 192 बाटल्या किंमत 92 हजार 160, डीएसपी ब्लॅक क्वार्टर 480 किंमत 1 लाख 15 हजार 200, डीएसपी ब्लॅक व्हिस्की मोठ्या बाटल्या 12 किंमत 8,160, रिझर्व सेवन व्हिस्की 12 बाटल्या किंमत 9,000, व मॅकडॉल नंबर वन व्हिस्की 48 बाटल्या किंमत 32,640 अशी एकूण 6,00,480 रुपयांची दारू जप्त केली.
विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत इतक्या मोठ्या प्रमाणात मद्य साठा जप्त केल्याने चंदगड तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तथापि जप्त केलेला हा साठा म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. पोलिसांनी शोध घेतल्यास गावोगावी असे साठे सापडतील. त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशीही मागणी होत आहे.
1 comment:
हिमनग कुठे आहे
Post a Comment