'सर्प आपला मित्र आहे' हे कै बाबूराव टक्केकरांनी कृतीतून दाखवले...! -भरमूआण्णा पाटील, ढोलगरवाडी येथे सर्पमित्रांची राज्यस्तरीय परिषद लवकरच - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2024

'सर्प आपला मित्र आहे' हे कै बाबूराव टक्केकरांनी कृतीतून दाखवले...! -भरमूआण्णा पाटील, ढोलगरवाडी येथे सर्पमित्रांची राज्यस्तरीय परिषद लवकरच

 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
       'सर्प हा आपला मित्र आहे' हे बाबुराव टक्केकर यांनी आपल्या कृतीतून जगाला पटवून दिले आहे. सन १९६६ मध्ये गाव व परिसरातील लोकांच्या शिव्या खात पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या सापाला जीवदान देण्यासाठी मामासाहेब लाड विद्यालय संलग्न सर्प शाळा सुरू केली. या सर्प शाळेची ख्याती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य टक्केकर व त्यांच्या अनुयायांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सर्पमित्रांमुळे हजारो सापांचे जीव वाचत आहेत. सर्प प्रेमींनी त्यांना दिलेली 'आद्य सर्पमित्र' ही पदवी म्हणूनच सार्थ ठरली आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील यांनी केले. ते ढोलगरवाडी येथे आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
      यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कै. टक्केकर यांच्या समाधीस्थळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक एन जी यळ्ळूरकर यांनी केले. यावेळी बोलताना चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी झू अथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली वन विभाग कार्यालय नागपूर यांनी ढोलगरवाडी येथील सर्पशाळा प्राणी संग्रहालय नियमांची पूर्तता करत नसल्याच्या कारणावरून मानता रद्द करण्याची नोटीस बजावली असल्याचे सांगून. कै टक्केकर व त्यानंतर येथील मामासाहेब लाड विद्यालयातील आजपर्यंतच्या सर्व शिक्षकांनी लोक देणगी व पदरमोड करून सापांचे संगोपन व जनप्रबोधन करण्याचे मोठे कार्य सुरू ठेवले आहे. अशा प्रकारचे हे जगातील दुर्मिळ केंद्र टिकले पाहिजे व वाढले पाहिजे. याला शासकीय स्तरावरून अनुदान मिळावे अशी मागणी अनेक वर्षे सुरू असली तरी त्याला यश आलेले नाही. आता चंदगडचे नूतन आमदार शिवाजी पाटील भाजप शासनाच्या माध्यमातून याचा कायापालट करतील अशी आशा व्यक्त केली. सोलापूर येथून आलेले सर्पमित्र राहुल शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सापांची माहिती देणारे ढोलगरवाडी हे महाराष्ट्रातील हे एकमेव केंद्र असून ते टिकले पाहिजे. येथून मार्गदर्शन घेऊन हजारो सर्पमित्र तयार होऊन झाले आहेत. असे सांगून ढोलगरवाडी येथे महाराष्ट्रातील सर्पमित्रांची एक परिषद आयोजित करू करावी अशी सूचना मांडली. ही सूचना सर्वांना सर्वांनी उचलून धरली व लवकरच येथे सर्पमित्रांची दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद घेण्याचे ठरवण्यात आले.
         यावेळी रॉयल क्लासेसचे प्रा. युवराज पाटील, श्रीराम विद्यालय कोवाड चे माजी प्राचार्य ए. एस. पाटील, शेतकरी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष व सर्प विभाग प्रमुख तानाजी वाघमारे, बेळगाव येथील निवृत्त कर्नल आर. के. सिंग, विद्यार्थिनी अनुजा नेसरकर, साक्षी पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी श्रीमती शांताबाई बाबुराव टक्के कर यांचे चिरंजीव प्रकाश व संदीप टक्के कर संगम कक्केरी मारुती साळुंखे शिवाजी कोकितकर, डॉ. जाधव, नाग फाउंडेशन सोलापूरचे अध्यक्ष अनिल अलधर, वाइल्ड फोटोग्राफर अक्षय मगदूम आदींसह शिक्षक पालक विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले. एम. वाय. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment