|
चंदगड ग्रामीण रुग्णांलयात पत्रकारांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमावेळी बोलाताना पोलीस निरिक्षक विश्वास पाटील, शेजारी नायब तहसिलदार हेमंत कामत,वैद्यकीय अधिकारी डॉ.जोएब मकानदार, आगार प्रमुख सतीश पाटील व पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
पत्रकारांच्या निर्भीड बातम्यांमुळे समाज व प्रशासनाचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहते. तसेच जगातील सर्वात मोठी भारतीय लोकशाही मजबूत राहिली आहे. असे प्रतिपादन चंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी केले. ते मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे आयोजित चंदगड तालुक्यातील पत्रकारांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
|
पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार संपत पाटील यांचा सत्कार करतानाग्रामीण रुग्णालय चंदगडचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जोएब मकानदार व इतर अधिकारी. |
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले. प्रास्ताविकात पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे यांनी चंदगड पत्रकार संघाच्या ३० वर्षातील कार्याचा आढावा घेतला. यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक म्हणाले मी आत्तापर्यंत नऊ पोलीस स्टेशन मध्ये सेवा केली असून यापैकी चंदगड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले पत्रकार समाजासाठी झटून काम करणारे आहेत. येथील या पत्रकार संघाचे सांघिक कामही समाजाभिमुख राहिले आहे. त्यामुळे त्यांना दोन राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ही चंदगड तालुक्याला भूषणावह गोष्ट आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी उपस्थित नायब तहसीलदार हेमंत कामत म्हणाले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. चंदगड मधील पत्रकार आमच्या प्रशासनातील चुका निदर्शनाला आणण्याबरोबरच चांगल्या कार्यांना प्रसिद्ध देत आले आहेत.
|
पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार संतोष भोसले यांचा सत्कार करताना नायब तहसिलदार हेमंत कामत व इतर अधिकारी.
|
तहानभूक, वेळेची तमा न बाळगता सामाजिक स्वास्थ्यासाठी बातम्या देणाऱ्या पत्रकारांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत असे मत व्यक्त केले. ग्रामीण रुग्णालय चंदगडचे वैद्यकीय अधिकारी जोएब मकानदार, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील हासुरे, आर बी एस के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व पत्रकारांचे तपासणी रिपोर्ट नॉर्मल यावेत अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी चंदगड वन विभागाचे वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले, चंदगड एसटी आगार व्यवस्थापक सतीश पाटील, उद्योजक व आरोग्य विषयक मार्गदर्शक सुनील काणेकर आदींची भाषणे झाली. तर चंदगडचे दिवाणी न्यायाधीश विकृम अगरवाल व सह. दिवाणी न्यायाधीश वामन जाधव, पीडब्ल्यूडीचे अभियंता इफ्तिकार मुल्ला व पत्रकार संदिप तारीहाळकर यांनी वेळेअभावी दूरध्वनी वरून पत्रकारांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
|
पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचा सत्कार करताना पो. नि. विश्वास पाटील व इतर अधिकारी.
|
मागील वर्षभरात पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील (दैनिक पुढारी) यांना 'राष्ट्रीय दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कार', सी एल न्यूजचे संपादक व महाराष्ट्र दिनमानचे तालुका प्रतिनिधी पत्रकार संपत पाटील यांना 'महाराष्ट्र ॲचीवर्स सोशल अवार्ड' तर चंदगड टाइम्सचे संपादक संतोष सावंत- भोसले यांना 'आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार' प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उदयकुमार देशपांडे, संजय केदारी पाटील, संजय मष्णू पाटील, राहुल पाटील, सागर चौगुले, उत्तम पाटील, तातोबा गावडा आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंदगड ग्रामीण रुग्णांलयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जोएब मकानदार, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील हासुरे, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पोवार, आरोग्य सेविका सुप्रिया कांबळे, पूनम कांबळे, किशोरी कुंभार, आरोग्य सेवक चंद्रकांत देसाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजू चौगुले, अदिनाथ फार्मासिस्ट, सिक्युरिटीचे रवळनाथ गावडे व सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. माधूरी सावंत भोसले यांनी सुत्रसंचालन केले. साप्ताहिक सत्य घटनांचे संपादक राहुल पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment