चंदगड मधील 'महसूल भवन' जमीनदोस्त होण्यापूर्वी वापरात आणा, हळदणकर यांचे निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2024

चंदगड मधील 'महसूल भवन' जमीनदोस्त होण्यापूर्वी वापरात आणा, हळदणकर यांचे निवेदन

महसूल भवान इमारत संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देताना आनंद हळदणकर यांच्यासोबत विठ्ठल आदकारी, अशोक पेडणेकर, नागेश प्रधान व नाईकवाडी आदी

चंदगड : सी एल वृत्तसेवा
   चंदगड तहसील कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर म्हणजे केवळ हाकेच्या अंतरावर असणारी महसूल भवन इमारत गेली काही वर्षे विना वापर धूळ खात पडली आहे. ही इमारत पूर्ण जमीनदोस्त होण्यापूर्वी सार्वजनिक वापरात आणावी. अशी मागणी चंदगडचे नगरसेवक आनंद उर्फ बाळासाहेब हळदणकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी दि. १२/१२/२०२४ रोजी राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड यांना दिले.
  कोल्हापूर जिल्हा महसूल कल्याण निधी समितीमार्फत शासनाला आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याच्या हेतूने चंदगड  शहराच्या मध्यवर्ती भागात २४ वर्षांपूर्वी महसूल भवन इमारत बांधण्यात आली. पाच दुकान गाळे व मोठा हॉल तसेच समोर दुचाकी चार चाकी वाहने पार्किंग करण्यासाठी प्रशस्त जागा अशा सुविधा येथे आहेत. या इमारतीचे उद्घाटन २१/०९/२००० रोजी झाले होते. सुरुवातीची काही वर्षे  शिक्षकांसह इतर विभागांच्या कर्मचारी प्रशिक्षणासाठी, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमांसाठी येथील हॉलचा वापर केला जायचा. त्यानंतर काही वर्षे सातबारा आठ अ उतारे संगणकीकरण करण्यासाठी व इतर संगणकीय कामे करण्यासाठी वापर सुरू झाल्याने येथील नागरिकांचा राबता कमी झाला झाला. हळूहळू या इमारतीला अवकळा आली असून येथील खिडक्यांच्या महागड्या काचा, दरवाजे, खिडक्या समाजकंटकांनी लंपास करण्यास सुरुवात केली आहे.  हे असेच चालू राहिल्यास काही दिवसात ही इमारत इतिहास जमा व्हायला वेळ लागणार नाही. तत्कालीन तहसीलदार उत्तमराव पाटील यांच्या प्रयत्नाने २५ वर्षांपूर्वी ७ लाख २१ हजार रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात आली होती.
 यातील पाच गाळे महसूल विभागामार्फत भाड्याने दिले असते तर पाच कुटुंबांचा चरितार्थ चालला असता.  निदान आता तरी हे दुकान गाळे भाडे तत्त्वावर तालुक्यातील तरुणांना देण्यात यावे. तसेच धूळखात पडून असलेला हॉल साखरपुडा, वाढदिवस, मीटिंग, अशा विविध कार्यक्रमांसाठी  चंदगड शहरातील नागरिकांना उपलब्ध करून द्यावा. असे केल्यास आलेल्या पैशातून इमारतीची देखभाल दुरुस्ती राहील शहरातील काही तरुणांना रोजगार मिळेल व महसूल खात्याला सुद्धा उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण होईल. असे हळदणकर यांनी निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन त्यांनी तहसीलदार चंदगड यांना दिले. यावेळी हळदणकर यांच्यासोबत विठ्ठल आदकारी, अशोक पेडणेकर, नागेश प्रधान व नाईकवाडी आदी नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment