चंदगड : सी एल वृत्तसेवा
गेले साडेपाच महिने बंद असलेली तिलारी घाटातील पणजी दोडामार्ग बस सेवा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नव्या आदेशाने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामी 'चंदगड तालुक्याचे मुखपत्र' चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज तथा चंदगड लाईव्ह न्युज चा पाठपुरावा निर्णायक ठरला. लवकरच मार्गावरील एसटी सुरू होणार असल्याने मार्गावरील प्रवासी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
घाटात एका ठिकाणी कोसळलेल्या संरक्षक कठड्यामुळे पावसाळ्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी तिलारी दोडामार्ग घाटातून सर्व प्रकारची लहान मोठी, अवजड वाहने तसेच एसटी बस जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आदेश काढून बंद केली होती. ही बंदी १ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२४ अखेर घालण्यात आली होती. तथापि एसटी वगळता सर्व प्रकारची अवजड वाहतूक घाटातून सुसाट सुरूच होती. ३१ ऑक्टोबरची डेडलाईन संपून दीड महिना झाला. या दीड महिन्यात अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही गरिबांची एसटी सुरू करण्याच्या मागणीची जिल्हाधिकारी प्रशासनाने दखल घेतली नव्हती. अखेर याबाबतचे वृत्त चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांसह व महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या सी एल न्यूज पोर्टल चॅनल मधून प्रसिद्ध होताच एसटी सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला. कोल्हापूर चे प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी या संदर्भातील पत्र विभाग नियंत्रक राज्य परिवहन कोल्हापूर यांना १२ डिसेंबर रोजी दिले आहे.
या पत्रात ही बाब तांत्रिक स्वरूपाची असल्याने संबंधित बांधकाम विभागाशी संपर्क साधून त्यांच्या अभिप्रायानुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन आपल्या स्तरावर बस सेवा सुरु करण्याची कार्यवाही करावी, असे कळवले आहे. त्यानूसार आता सार्वजनिक बांधकाम विभागाने एसटी महामंडळाला एसटी वाहतूक सुरू करण्याबाबतचे पत्र देणे गरजेचे आहे. हे पत्र जितक्या लवकर एसटी महामंडळाला मिळेल तितक्या लवकर सर्व आगारांच्या बस गाड्या येथून धावणार आहेत. यामुळे गेले पाच सहा महिने होत असलेली प्रवाशांची कुचंबणा संपेल अशी आशा असून या पत्रामुळे प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment