कीर्तन संमेलनास उपस्थित माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, संग्रामसिंह कुपेकर यांचे स्वागत करताना स्वागत अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, प्रा दीपक पाटील आदी
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज तसेच चंदगड तालुका व बेळगाव सीमा भाग वारकरी संप्रदायाच्या वतीने ढोलगरवाडी ता. चंदगड येथे आयोजित वारकरी कीर्तन संमेलनास वारकरी व नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. आज शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी सातेरी देवी मंदिर परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास हजारो वारकरी व भाविकांची उपस्थिती होती. मुख्य आयोजक, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा सुनील शिंत्रे यांनी आलेल्या मान्यवर व भाविकांचे स्वागत केले. सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडीने सोहळ्याची सुरुवात झाली. या नंतर दिवसभर अनुक्रमे ध्वज पूजन, व्यासपीठ पूजन, प्रवचनकार इंद्रजीत देशमुख यांचे प्रेरणादायी व्याख्यान, दुपारी महाप्रसाद त्यानंतर हरिपाठ, वारकरी सन्मान सोहळा व सायंकाळी हरिभक्त परायण कथाकीर्तन प्रवक्ते रामेश्वर भोजने (देवाची आळंदी) यांचे कीर्तन पार पडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा सुनील शिंत्रे यांच्या पुढाकाराने अशा प्रकारचे कीर्तन संमेलन चंदगड तालुक्यात प्रथमच पार पडले.
या कार्यक्रमास माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी जि प बांधकाम सभापती संग्रामसिंह कुपेकर, गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, मार्गदर्शक ह भ प विश्वनाथ पाटील, ढोलगरवाडीच्या सरपंच सुष्मिता पाटील, प्रा शिवाजीराव भुकेले, श्रीरंग राजाराम, सोमगोंडा देसाई, प्रा सदाशिव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कीर्तन संमेलनास प्रचंड संख्येने उपस्थित वारकरी व भाविक |
No comments:
Post a Comment