चंदगड आगाराला नव्या २० बसेस द्याव्यात - चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची मुख्यमंत्र्याच्याकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

23 December 2024

चंदगड आगाराला नव्या २० बसेस द्याव्यात - चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची मुख्यमंत्र्याच्याकडे मागणी

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      चंदगडचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी उपविभागातील चंदगड, गडहिंग्लज व आजरा या तिन्ही आगारांना प्रत्येकी २० नव्या एसटी बस गाड्या द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ शिफारस करून हे पत्र परिवहन विभागाच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. त्यामुळे चंदगड एसटी आगाराला नवीन बस गाड्या मिळतील त्यामुळे ग्रामीण प्रवाशांच्या अनेक समस्या सुटतील अशी आशा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.

       एकेकाळी म्हणजे गेल्या २०-२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात नंबर वन असलेल्या एसटी महामंडळाच्या चंदगड डेपोला अनेक कारणांनी हळूहळू अवकळा प्राप्त झाली. गेली बरीच वर्षे चंदगड आगारात फुल कंडिशन बस गाड्यांसह चालक वाहकांची कमतरता आहे. बस आहे पण कंडक्टर नाही, कंडक्टर आणि बस आहे पण ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर कंडक्टर आहे पण बस नाही अशा घटना नित्याच्या बनलेल्या आहेत. नादुरुस्त बस दुरुस्ती करण्यासाठी कार्यशाळेत पुरेसा तज्ञ कामगार वर्ग नाही. परिणामी अनेक बस मार्गावर धावतानाच बंद पडतात, याचा मोठा मनस्ताप प्रवासी वर्गाला होतो. या सर्वांचा परिपाक म्हणून अनेक मार्गावरील एसटी बस फेऱ्या कायमच्या बंद करण्याची नामुष्की गेल्या काही वर्षात चंदगड आगारावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण एसटीला किंबहुना ग्रामीण भागातील प्रवाशांना बसला आहे.

        २००० सालापर्यंत चंदगड आगार उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात अग्रेसर होते. हळूहळू एसटीच्या सुवर्ण युगाला उतरती कळा लागली २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारी काळात महाराष्ट्रातील एसटी अधिकच कोलमडली. त्यात चंदगड आगारही आलेच. चंदगड आगारात १५-२० वर्षांपूर्वी आलेले आगार व्यवस्थापक सुनील जाधव यांच्यानंतर इथे खंबीर अधिकारी मिळाला नाही. सद्यस्थितीत  म्हणजे गेल्या दोन महिन्यापूर्वी सतीश पाटील यांनी चंदगड चे आगार प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांची काम करण्याची पद्धती ही प्रवासी व कामगार भिमुख असल्याने आहे त्या परिस्थितीतही त्यांनी उठावदार  कामगिरी केल्याचे दिसून येते. येत्या काही काळात आमदारांची साथ लाभल्यास त्यांच्याकडून भरीव कामगिरी होऊन चंदगड आगाराला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल शक्यता व्यक्त होत आहे.

        चंदगडचे नवनिर्वाचित आमदार म्हणून शिवाजीराव पाटील या धडाडीच्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात त्यांना येथील समस्यांची चांगली जाण आहे. हे त्यांनी आमदार झाल्यानंतर  पंधरा-वीस दिवसातच दाखवून दिले आहे. १२ डिसेंबर २०२४ रोजी  त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून चंदगड मतदार संघात येणाऱ्या चंदगड, गडहिंग्लज व आजरा या तिन्ही आगारांना प्रत्येकी २० एसटी बस गाड्यांची मागणी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्री महोदय यांनीही तात्काळ शिफारस करून परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची पूर्तता करण्याबद्दल सुचवले आहे. आमदार पाटील यांच्या मागणीनुसार तिन्ही आगारांना प्रत्येकी २० बस गाड्या, तसेच कमी असलेले वाहक, चालक व कार्यशाळेतील तंत्रज्ञ यांची पूर्तता झाल्यास उपविभागातील प्रवाशांच्या अनेक समस्या सुटणार आहेत. याचा फायदा येथील विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना होईल म्हणून आमदार साहेब यांच्याकडून याबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

       चंदगड तालुक्यात किंबहुना महाराष्ट्रात फोफावलेला वडाप व्यवसाय शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत तर ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना पूर्ण मोफत प्रवास सुरू केल्याने गेल्या ४ वर्षात वडाप व्यवसाय थंडावला आहे. परिणामी वडाप वर अवलंबून असलेल्या प्रवाशांना एसटी शिवाय पर्याय उरलेला नाही. हे ओळखून उपविभागातील सर्व मार्गांचे पुन्हा सर्वेक्षण करून नव्या बस सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. तथापि हे केवळ नवीन बस गाड्या, वाहक, चालक व कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल तेव्हाच शक्य होणार आहे.

No comments:

Post a Comment