सत्तूराम कल्लाप्पा भोगण |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक ह भ प सत्तूराम कल्लाप्पा भोगण (वय ९७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने काल शनिवार दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता निधन झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण यांचे वडील तर कोवाडच्या विद्यमान सरपंच सौ अनिता भोगण यांचे सासरे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, जि प सदस्य कल्लाप्पा भोगण, निवृत्त ग्रामविकास अधिकारी पी एस भोगण व दीपक भोगण हे तीन चिरंजीव व विवाहित दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कोवाड येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी भाताचा व्यापार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. खडतर कष्ट करून आपल्या तिन्ही मुलांना सुशिक्षित केले. स्वतः गरीबीच्या झळा सोसत असूनही गावातील सोंगी भजन कार्यक्रमातून श्रीकृष्णाचा सवंगडी पेंद्याच्या विनोदी भूमिकेतून लोकांचे मनोरंजन केले. या भूमिकेतून त्यांनी केलेली हसवणूक आज ही जुन्या काळातील लोक विसरले नाहीत. सोंगी भजनातील अभिनय व भजनातील त्यांचे गायन हा कोवाड गावासाठी अभिमानाचा विषय होता. कोवाड येथे चंदगड तालुक्यातील पहिले ज्ञानेश्वरी पारायण यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ही परंपरा पुढे चालवण्यात ते यशस्वी झाले. आजही कोवाड चे ज्ञानेश्वरी पारायण परिसरात श्रद्धेचा विषय ठरले आहे. त्यांच्या जाण्यामुळे कोवाड पंचक्रोशी एका जुन्या काळातील भजन गायक, कलाकाराला मुकली आहे.
No comments:
Post a Comment