चालकाच्या हलगर्जीपणामुळे कालकुंद्री येथे गर्दीच्या ठिकाणी कोसळलेली ट्रॅक्टर- ट्रॉली
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
ओलम (हेमरस) साखर कारखान्याकडे ऊस भरून जाणारा ट्रॅक्टर कालकुंद्री (ता. चंदगड) येथील एसटी स्टँड चौकात भर गर्दीच्या ठिकाणी कोसळला. मात्र सुदैवाने जीवित हानी टळली. ही घटना काल बुधवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास घडली. प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीला लागूनच ही ट्रॉली कोसळली. यावेळी शाळा सुटली नव्हती म्हणून मोठा अनर्थ टळला.
आंबेवाडी येथील हा ट्रॅक्टर बसर्गे येथून ऊस घेऊन ओलम कडे चालला होता. कागणी येथून कालकुंद्री गावात जाताना एसटी स्टँड चौकाच्या सुरुवातीस असलेल्या चढावा वर हलगर्जीपणामुळे चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले. धोकादायक रित्या भरलेल्या दोन्ही ट्रॉल्या उताराने मागे सरकू लागल्या. हा लोड थोपवणे ट्रॅक्टरच्या ताकती बाहेरचे ठरू लागल्याने एकच हलकल्लोळ उडाला. तथापि मागील चार चाकी ट्रॉली दोन्ही ट्रॉल्यांमधील जोड तुटून रस्त्यावर कोसळली. परिणामी ट्रॅक्टर व पुढची ट्रॉली त्याला धडकून थांबली. तुटलेली ट्रॉली उतारावर मागे गेली असती तर मोठा अनर्थ घडण्याचा संभव होता. उसासह कोसळलेल्या ट्रॉलीमुळे या मार्गावरील वाहतूक दोन ते तीन तास ठप्प होती. शेवटी बसर्गे येथून तोडणी टोळीचे कामगार आल्यानंतर रस्त्यात कोसळलेले ऊस बाजूला काढून पुन्हा दुसऱ्या ट्रॉलीत भरून रस्ता मोकळा करण्यात आला.गेल्या चार पाच वर्षात कोवाड, दुंडगे, कामेवाडी रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. परिणामी चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातून होणारी हेमरस कडील ९० टक्के ऊस वाहतूक कागणी, कालकुंद्री, कुदनूर, राजगोळी मार्गे होत आहे. यातील अपवाद वगळता कोणत्याही ट्रॅक्टर ट्रॉलीला मागे रिफ्लेक्टर बसवलेले नसतात. गेली दहा वर्षे हे असेच सुरू आहे. यामुळे गेल्या चार-पाच वर्षात रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर ट्रॉलीला मागे धडकून किंवा चाकाखाली सापडून दुचाकीस्वार व व मागे बसलेल्या काही जणांनी आपले प्राण गमावले आहेत. याला जबाबदार कोण? हा प्रश्नच आहे. या घटनांचा बोध न घेता बिना रिफ्लेक्टर चे ट्रॅक्टर रस्त्यावरून धावत आहेत. याचे सोयर सुतक कारखाना प्रशासनाला दिसत नाही. हीच अवस्था इकोकेन महाळुंगे व दौलत साखर कारखाना हलकर्णी कडे वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉल्यांची आहे. येजा करताना ट्रॅक्टर वर मोठ्या आवाजात गाणी लावलेली असतात त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांचे हॉर्न ड्रायव्हरला ऐकू जात नाहीत. यात सुधारणा न झाल्यास कालकुंद्री येथून ट्रॅक्टर पुढे जाऊ देणार नाही असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment