मराठी पत्रकार परिषदेचे 'आदर्श पत्रकार संघ' पुरस्कार जाहीर, सेलू जि. परभणी येथे १ फेब्रुवारीला पुरस्कारांचे वितरण, चंदगड तालुक्यातून मोठ्या संख्येने पत्रकार जाणार - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2024

मराठी पत्रकार परिषदेचे 'आदर्श पत्रकार संघ' पुरस्कार जाहीर, सेलू जि. परभणी येथे १ फेब्रुवारीला पुरस्कारांचे वितरण, चंदगड तालुक्यातून मोठ्या संख्येने पत्रकार जाणार

  


चंदगड : सी एल वृत्तसेवा
      मराठी पत्रकार परिषदेचे दिवंगत अध्यक्ष वसंतराव काने आणि रंगा अण्णा वैद्य यांच्या नावाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आदर्श तालुका पत्रकार संघ आणि आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांनी नुकतीच केली आहे. या पुरस्कारांचे वितरण १ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्रकारिता व विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सेलू, जिल्हा परभणी येथे होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी चंदगड तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने जाणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी दिली आहे. चंदगड तालुका पत्रकार संघाने हा पुरस्कार सन २०२० मध्ये पटकावला होता. त्यावेळी या पुरस्काराचे वितरण अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले होते.
   रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघाला जाहीर झाला आहे तर वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कारांसाठी पुढील तालुका पत्रकार संघांची निवड करण्यात आली आहे. संभाजीनगर विभागातून सेलू तालुका मराठी पत्रकार संघ (जिल्हा परभणी), लातूर विभागातून उमरगा तालुका पत्रकार संघ (जिल्हा लातूर), कोल्हापूर विभागातून कणकवली तालुका पत्रकार संघ (जिल्हा सिंधुदुर्ग), पुणे विभागातून पिंपरी चिंचवड तालुका पत्रकार संघ (जिल्हा पुणे), अमरावती विभागातून खामगाव प्रेस क्लब संलग्न मराठी पत्रकार परिषद (जिल्हा बुलढाणा), नागपूर विभागातून बुटीबोरी तालुका पत्रकार संघ (जिल्हा नागपूर), नाशिक विभागातून शहादा तालुका पत्रकार संघ (जिल्हा नंदुरबार) आणि कोकण विभागातून चिपळूण तालुका पत्रकार संघ (जिल्हा रत्नागिरी). तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचा राज्य पातळीवर पुरस्कार देऊन गौरव करण्याचा उपक्रम मराठी पत्रकार परिषदेने गेल्या बारा वर्षापासून सुरू केला आहे. 
  पुरस्कार विजेत्या सर्व तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमास राज्यातील मराठी पत्रकार परिषदेसह परिषद अंतर्गत तालुका डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन एस एम देशमुख यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment