एव्हीएम हटाव तिरडी मोर्चा आंदोलन प्रसंगी महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्ते. |
आजरा : सी एल वृत्तसेवा
आजरा येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या एव्हीएम विरोधातील तिरडी मोर्चाला घटक पक्षातील कार्यकर्ते व नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मोर्चानंतर ईव्हीएमची तिरडी जाळण्याच्या प्रयत्न करताना आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
एव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीने माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिरडी मोर्चा काढला. मोर्चाला छ. शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरवात झाली. यावेळी एव्हीएम हटाव देश बचाव, एव्हीएम हटाव संविधान बचाव, बॅलेट पेपरवर मतदान झालेच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा छ. संभाजी महाराज चौकात आला.
यावेळी माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत एव्हीएममध्ये छेडछाड करून आमची मते विरोधी उमेदवारांना दिली. त्यामुळे कोणत्याही एका गावात पेपरवर मतदान घेण्याची आमची मागणी आहे.
काँ. संपत देसाई म्हणाले, "राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असे निश्चित होते. परंतु एव्हीएम वरुन जिंकले आहे. गैरप्रकार करून हे सरकार सत्तेवर आले आहे. विरोधी उमेदवारांना जाणीवपूर्वक पराभूत केले आहे. जनतेच्या मनात याचा राग आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले, "देशाला विचार करायला लावणारा निकाल आहे. सत्तेतील सरकार ई डी, सी बी आय, निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करत आहे. प्रगत राष्ट्रमध्ये बँलेट पेपरवर मतदान घेतले जाते. मात्र सत्तेसाठी आपल्या देशात एव्हीएम वर मतदान घेतले जाते. यावेळी आंदोलकांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चात मुकुंदराव देसाई, गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, माजी सभापती उदय पवार, उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, राजू होलम, रणजीत देसाई, संजयभाऊ सावंत, रविंद्र भाटले, समीर चांद, संजय घाटगे, दिनेश कांबळे, शिवाजी आढाव, सचिन देसाई, दयानंद भोपळे यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment