नेसरी- नागनवाडी मार्गावरील वळणांवर वाढलेल्या गवत व झुडपांमुळे अपघातांना आमंत्रण - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2024

नेसरी- नागनवाडी मार्गावरील वळणांवर वाढलेल्या गवत व झुडपांमुळे अपघातांना आमंत्रण

नेसरी- नागनवाडी मार्गावरील वळणांवर वाढलेल्या गवत व झुडपांमुळे अपघातांना आमंत्रण

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
   नेसरी ते नागनवाडी रस्त्यावरील अनेक वळणांवर झाडे झुडपे व गवत वाढले आहे. यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने रोजच अपघातांचे प्रसंग घडत आहेत. मोठे अपघात होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व वळणांवर वाढलेली झुडपे, गवत तोडून साफ करावे, अशी मागणी होत आहे.
    गडहिंग्लज, चंदगड, तिलारीनगर राजमार्ग १८९ पैकी नेसरी- तिलारीनगर, कोदळी हा रस्ता मागील वर्षी नव्याने रुंदीकरण, डांबरीकरण पूर्ण झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून गोवा, दोडामार्ग, चंदगड, नागनवाडी भागातून नेसरी, गडहिंग्लज, संकेश्वर, कोल्हापूर कडे जाणारी वाहने नेहमी सुसाट असतात. तथापि या रस्त्यांपैकी नेसरी ते नागनवाडी दरम्यान अनेक वळणांवर झुडपे व गवत फोफावले आहे. परिणामी रस्त्याकडे ला लावलेले सूचना, दिशादर्शक व इशारा फलक गवतामुळे झाकून गेले आहेत. अशावेळी समोरून येणारी वाहने एकमेकांना दिसत नाहीत. अशा वळणावर अपघातांच्या संभव वाढला आहे मागील वर्षीही अशा अपघातांच्या घटना घडल्या होत्या. गतवर्षी पेक्षा यंदाचा पावसाळा अधिक दिवस चालल्यामुळे गवत व झुडपे फोफावण्यास मदत झाली आहे. अशी बेसुमार वाढलेली झुडपे तात्काळ तोडून स्वच्छ करावीत. जेणेकरून येणाऱ्या सर्व वाहनांना पुढील रस्ता दिसेल त्याचबरोबर झाकले गेलेले किलोमीटरचे दगड, इशारा व दिशादर्शक फलकही वाहनधारकांना दिसतील.
   पावसाळा संपताच सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी रस्त्यांचे पॅचवर्क करणे, नवीन रस्ते करणे असे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. ज्यामुळे वाहनधारक व प्रवाशांचा प्रवास आरामदायक होण्यास मदत होत असून अधिकाऱ्यांनी वरील मार्गावरील वळणांवर असलेली गवत, झुडपे तोडून स्वच्छ करावीत तसेच झाकले गेलेले विविध फलक स्पष्ट दिसण्यासाठी  सततच्या पावसामुळे फलकांवर आलेले शेवाळ धुऊन स्वच्छ करावे. अशीच काहीशी परिस्थिती चंदगड तालुक्यातील अनेक रस्त्यांवर असून तिकडेही तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
 नेसरी, अडकूर, नागनवाडी मार्गावरील अनेक वळणांवर वाढलेले असे गवत व झुडपांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.

No comments:

Post a Comment