दिवंगत माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांना कोल्हापूर महादेव कोळी समाज यांच्याकडून शब्दसुमनांजली !!! - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2024

दिवंगत माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांना कोल्हापूर महादेव कोळी समाज यांच्याकडून शब्दसुमनांजली !!!


माजी मंत्री मधुकरराव पिचड

प्रासंगिक

महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व तमाम महाराष्ट्रातील आदिवासी हृदयसम्राट मधुकरराव काशिनाथ पिचड यांचे प्रदीर्घ आजाराने  नुकतेच निधन झाले. कोल्हापूर जिल्हा आदिवासी महादेव कोळी जमातीच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली ...

चंदगड तालुक्यातील आदिवासी महादेव कोळी जमातीचे व मधुकरराव पिचड यांचे  संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आणि सौहार्दपूर्ण होते. आदिवासी विकास मंत्री असताना कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांचे प्रश्न समजावून घेऊन  मार्ग काढण्यासाठी चंदगडच्या तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर व सिद्धार्थ   कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. कृष्णा पाटील, प्रा बसवंत पाटील , डॉ विठ्ठल पाटील  यांच्या उपस्थितीत व नंदाताई बाभुळकर यांच्या विशेष प्रयत्नाने  तब्बल 1 तासाची बैठक स्वतःच्या दालनात घेतली होती.

तसेच , डिसेंबर २०१३ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात केंद्र शासनाच्या पेसा कायद्याचा विस्तार करण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करणार असल्याची घोषणा करून थांबले नाहीत तर चंदगड तालुक्यातील चिंचणे व कामेवाडी  आदिवासी ग्रामपंचायत पेसा कायद्यात समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी , कोल्हापूर यांचेकडून सकारात्मक प्रस्ताव  मागविला. या कामी मंत्रालयात चार वेळा व्यक्तिशः भेटून पाठपुरावा केला .मात्र तो अहवाल मुदतीत शासनाकडे पोहोचला नाही व प्रस्ताव प्रलंबित राहिला. पुढे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने साहेबांचा पराभव झाला. मात्र, पेसा प्रकरणाचा पाठपुरावा चालूच ठेवला . जेंव्हा साहेबांच्या वरळी येथील निवासस्थानी या संबंधी भेटलो तेंव्हा साहेबांनी या संबंधी उच्च न्यायालयात राज्य सरकार विरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यास सांगितले .गौराई फौंडेशन ,कोल्हापूर या सार्वजनिक न्यासाच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली , सदरची जनहित याचिका फेटाळली गेली पण हिम्मत न हरता न्यायासाठी मा सर्वोच्च न्यायालयात एस एल पी दाखल केली .यावर सुनावणी होऊन मा सर्वोच्च न्यायालयाने राज्यसरकारने अर्जदारची संपूर्ण बाजू  ऐकून निर्णय घ्यावे .सद्यस्थितीत हे प्रकरण राज्यशासनाकडे प्रलंबित आहे .

एका आमदाराने विधानसभेत करावयाचे काम तुम्ही करताय .असेच  प्रयत्नशील रहा  यश नक्की येईल असा आपुलकीचा सल्ला देणारे व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड गेला , ही पोकळी न भरून निघणारी आहे.

- प्रा. बसवंत पाटील, कोल्हापूर , 

अध्यक्ष, गौराई फौंडेशन / तथा विभागीय अध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र), 

आदिवासी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.

No comments:

Post a Comment