कवितेसाठी तपस्या महत्त्वाची - प्रा. पी. ए. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2025

कवितेसाठी तपस्या महत्त्वाची - प्रा. पी. ए. पाटील



चंदगड / प्रतिनिधी
     कविता ही मानवी नात्यांना अधोरेखित करणारी असते. कवीला चांगली कविता लिहिण्यासाठी चांगले वाचन, शब्दसंग्रह, प्रतिमा, प्रतीके, भाषिक शैली ,अशा असंख्य गोष्टींबरोबर अवतीभोवतीच्या जगण्याची नोंद सूक्ष्मपणे घेणे गरजेचे असते. कवीची भाषा ही स्वतंत्र असते ."असे प्रतिपादन प्रा. पी.ए. पाटील यांनी केले. दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित ' काव्यवाचन स्पर्धा' उपक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी .अजळकर होते.
    प्रारंभी मान्यवरांचे स्वागतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. काव्यवाचन स्पर्धेत सुमारे १६ विद्यार्थ्यांनी स्वरचित काव्यरचनेबरोबरच प्रतिभावंतांच्या कवितांचे ही वाचन केले. सुमारे दीड तास कवितेच्या मैफिलीत सर्व विद्यार्थी आणि उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. अध्यक्ष प्राचार्य डॉ. अजळकर म्हणाले " तारुण्याच्या उंबरठ्यावर कविता हा एक महत्त्वाचा जगण्याचा धागा असतो. मात्र त्याचबरोबर समाज वाचणे, अंतर्मुख होणे आणि व्यक्त होणे याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण अधिकाधिक वाचत गेलो की आपल्याला व्यक्त होण्याला आतून ऊर्जा मिळते." यावेळी प्रा. सौ. जे.एम.उत्तुरे, प्रा .पी. ए.बोभाटे,डॉ.जे जे व्हटकर, प्रा . निलेश शेळके, श्री प्रशांत शेंडे , हर्षदा सावरे आदींच्या सह विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी कु. अंकिता पाटील, कु. अनुजा पाटील ,कु. दीक्षा पाटील अशा अनेक विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार सौ जे एम उत्तुरे यांनी मानले ,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले.

No comments:

Post a Comment