तुडये- म्हाळुंगे रोडवर उसाने भरलेल्या ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2025

तुडये- म्हाळुंगे रोडवर उसाने भरलेल्या ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार

चंदगड : सी एल वृत्तसेवा
   तुडये- म्हाळुंगे (ता. चंदगड) रोडवर काल दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास उसाने भरलेला ट्रक अंगावर पडल्यामुळे दुचाकीस्वार ठार झाला. दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव मंगेश रामू पाटील राहणार मळवी, पोस्ट तुडये तालुका चंदगड (वय 40) असे आहे. याबाबतची फिर्याद शिवाजी शंकर पाटील, मळवी यांनी चंदगड पोलिसात दिली असून ट्रक नंबर MH 09, EM 5774 च्या चालका विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106 (1), 281, 125 अ ब, मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   याबाबतची चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, घटनेतील मयत हे आपल्या जुन्या मळवीच्या शेताकडून इको केन साखर कारखाना म्हाळुंगे बाजूकडे मोटरसायकल वरून जात होते. यावेळी घटनेतील ट्रक हा त्यांचे समोर चाललेला होता. यावेळी ट्रकच्या इंजिन मधून ऑइल गळती सुरू होती. तसेच पाठीमागील चाकाचे नटबॉल तुटल्यामुळे चाकी ट्रकची मागील चाके वेडीवाकडी फिरत होती. तरीही ट्रक चालक याकडे दुर्लक्ष करून ट्रक पुढे चालवतच होता. यावेळी अचानकपणे ट्रकचे मागील चाक निखळले व पाठीमागून येणाऱ्या मंगेश पाटील यांच्या दुचाकीला धडकले. यावेळी ते दुचाकीसह जमिनीवर पडले. याचवेळी उसाने भरलेला ट्रक त्यांच्या अंगावर पलटी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणाने झाल्याने त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. तथापि अपघात घडताच  तो घटनास्थळावरून पसार झाला आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदवून गुन्ह्याची प्रत चंदगड कोर्टात पाठवण्यात आली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल नाईक हे करत आहेत.
 दरम्यान काल सायंकाळी अपघाताची बातमी कळतात पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी जमलेला जमाव प्रक्षोभक झाला होता. तरी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळून नियंत्रित केली.

No comments:

Post a Comment