चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात वैजनाथ डोंगर व दुर्गाडी डोंगराच्या मध्ये दोन-चार गावे वसलेली आहेत. त्यातील एक गाव म्हणजे बुक्कीहाळ बुद्रुक. येथील ग्रामस्थांना पुरेशी शेतजमीन नाही, असली तरी पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे चरितार्थ चालेल असा कोणताच व्यवसाय नाही. परिणामी येथील बहुतांशी ग्रामस्थांचा गेल्या पंचवीस तीस वर्षांपूर्वी पर्यंत हातभट्टीची दारू तयार करणे व ती विकणे हाच उदरनिर्वाहाचा व्यवसाय असायचा. या बेकायदेशीर धंद्यामुळे पोलिसांचा ससेमिरा सातत्याने येथील ग्रामस्थांच्या मागे ठरलेला असे. डोंगर कपारीत हातभट्टी चालवणारे ग्रामस्थ पोलिसांची चाहूल लागताच वाट दिसेल तिकडे पळत सुटायचे. पण आज ही परिस्थिती इतिहास जमा झाली आहे. ९० टक्के 'कृष्ण गवळी' समाजातील असलेले येथील ग्रामस्थ कष्ट करून स्वाभिमानाने जीवन जगताना दिसत आहेत. याचे बहुतांशी श्रेय येथील रहिवाशी हरिभक्त परायण कै दत्तू सोनाप्पा कोकितकर यांना जाते.
बुक्कीहाळ बुद्रुक येथील पहिले वारकरी म्हणून परिचित असलेले हभप दत्तू कोकितकर यांचे शनिवार दिनांक ४/१/२०२५ रोजी वयाच्या ८० या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने बुक्कीहाळ बुद्रुक ग्रामस्थांचा एक मार्गदर्शक हरपला आहे. यांच्या निधनानंतर रविवार दि १२/१/२०२५ रोजी त्यांचे दिवस कार्य आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी थोडेसे...
३० एप्रिल १९४६ रोजी त्यांचा जन्म एका साधारण मराठा कुटुंबात झाला. बुक्कीहाळ बुद्रुक सारख्या दुर्गम, शिक्षणाचा गंध नसलेल्या गावात राहूनही त्यांनी त्या काळात सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. त्यांची इच्छा असती तर ते त्या काळात शिक्षक सुद्धा होऊ शकले असते. पण ते टाळून कुटुंब समाजाची सेवा करण्याची व्रत घेतले व ते अखेर पर्यंत टिकवले. गावातील ग्रुप ग्रामपंचायतचे ते काही काळ सदस्य व गाव पंच ही होते.
आजूबाजूच्या परिसरातील गावांत शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहेत व त्यातून प्रगती साधत आहेत. हे पाहून त्यांनी ग्रामस्थांना दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहित केले व त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळवून देण्यासाठी दूध संस्था स्थापन करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन दिले. आज तालुक्यात बुक्कीहाळ येथील दुधाचा दर्जा व तेथील दूध संस्थांचा सभासदाभिमुख कारभार यातून होत असलेली ग्रामस्थांची प्रगती हा कौतुकास्पद चर्चेचा विषय ठरला आहे.
वयाच्या चाळीशीत ते वारकरी संप्रदायाकडे वळले. त्या काळात गावातील अनेकांना व्यसनांपासून परावृत्त करून गावातील सुमारे ४० जणांना वारकरी संप्रदायात आणले. व्यसनांपासून दूर राहून कष्ट करण्याची सवय लावल्यामुळे अशी कुटुंबे प्रगती करू शकली. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी राहण्यासाठी केवळ झोपड्या असलेल्या या गावात आता सिमेंट काँक्रीटच्या इमारती दिसू लागल्या आहेत. दत्तू कोकीतकर एक दानशूर व्यक्तिमत्व होते. गावातील अडले नडलेल्यांच्या गरजा पदरमोड करून ते पूर्ण करत त्यामुळेही गावात त्यांना आदराचे स्थान होते. वारकरी संप्रदायात गेल्यापासून त्यांना भजन व कीर्तनाची आवड होती. मृत्यू समयी सुद्धा त्यांनी कीर्तन ऐकतच आपले प्राण सोडले. ही सुध्दा एक विशेष घटनाच म्हणावी लागेल.
दुर्गम डोंगराळ गावात असूनही जुन्या काळात सातवी पर्यंत शिकलेल्या दत्तू यांची शिक्षणाची आवड घरच्या परिस्थितीमुळे पूर्ण होऊ शकली नाही. तथापि त्यांनी आपली हौस मुलांना व नातवंडना उच्चशिक्षित करून पूर्ण केली. त्यांचे चिरंजीव सोनाप्पा हे उच्चशिक्षित पदवीधर असून सध्या जिल्हा परिषदेच्या करेकुंडी येथील प्राथमिक शाळेत विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचे नातू विनोद हे बीएएमएस (एम डी) डॉक्टर असून बेळगाव येथील के एल ई सारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दोन्ही नाती या सुद्धा उच्चशिक्षित असून त्यांनी बी फार्मसी कोर्स पूर्ण केला आहे.
अन्यायाविरोधात त्यांच्या मनात नेहमीच चिड असल्याने आपल्यासह कोणाच्याही बाबतीत होणाऱ्या अन्यायाविरोधात ते पेटून उठत. शेवटपर्यंत गावात ते एक आजात शत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून वावरले. म्हणूनच त्यांच्या जाण्याने बुक्कीहाळ बुद्रुक गाव व पंचक्रोशी हळहळली. पहिल्यापासून त्यांचा पिंड सत्यशोधक विचारांचा व पुरोगामी होता. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या रक्षा व अस्थि विसर्जन नदीपात्रात करून नदी प्रदूषित करण्याऐवजी शेतातील झाडांच्या मुळांमध्ये रक्षा विसर्जित करण्याचा परिवर्तनवादी निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेत त्याची अंमलबजावणी केली.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, तीन विवाहित मुली असा मोठा गोतावळा आहे. चंदगड तालुक्याचे मुखपत्र चंदगड लाईव्ह न्युज चॅनेल तथा सी एल न्यूज च्या वाचक व दर्शक परिवाराच्या वतीने अशा विशेष व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली....!
- शब्दांकन : श्रीकांत व्ही पाटील, कालकुंद्री
No comments:
Post a Comment