चंदगड : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून फिल्मी स्टाईलने पोलिसांच्या गाडीला ठोकरुन पलायन केलेल्या चार गुन्हेगारांना पकडण्यात कोल्हापूर जिल्हा पोलिसांना यश आले आहे. राजस्थान मधील या चोरट्यांना पोलिसांनी तिथे जाऊन जेरबंद केले. तथापि एटीएम मधील चोरून नेलेल्या १८ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा शोध अद्याप लागलेला नाही.
४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री बाराच्या दरम्यान निट्टूर रोड कोवाड येथील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून क्रेटा हुंडाई कारमधून चोरट्याने पलायन केले होते. गडहिंग्लज पोलिसांनी या कारचा थरारक पाठलाग सुरू केल्यानंतर पोलीस वाहनालाच धडक देऊन चोरटे पुढे पळाले. पण त्यांची कार हेब्बाळ जलद्याळ गावानजीक बंद पडली. ही कार तिथेच टाकून ते पळून जाण्यात यशस्वी झाले. पण या कार वरूनच चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
डुप्लिकेट नंबर (MH 01 EB 9918) प्लेट लावलेली ही कार राजस्थान येथील असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. मालकाचा शोध घेतल्यानंतर ती राजस्थान येथील सद्दाम खान यांची असल्याचे समजले. (RJ 45 CY 1676) हा या गाडीचा खरा नंबर होता. गाडी मालक सद्दाम याला गाठून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपला मित्र तस्लीम खान यांने नातेवाईक आजारी असल्याचे सांगून कार गाडी नेली होती. मात्र तेव्हापासून त्याचा संपर्क झाला नसल्याचे सांगितले.
चोरट्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागताच साध्या वेशातील पोलिसांनी सापळा लावून तस्लीम इसाखान (वय २०), अली शेर जमालो खान (वय २९), तालीम पप्पू खान वय २८), अक्रम शाबू खान (वय २५) सर्व रा. छोटी मस्जिद, सामदिका, तालुका पहाडी, जिल्हा भरतपुर (राजस्थान) यांना सीताफिने अटक केले. चारही संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन सविस्तर स्टोरी पोलिसांसमोर कथन केली. तथापि त्यांच्याकडे चोरीची रक्कम सापडली नाही. ही रक्कम आपले मित्र इस्माईल, अकबर व सलीम यांच्याकडे असल्याचे सांगितले. यावरून गुन्हे अन्वेषणचे पथक राजस्थान मध्ये त्यांचा शोध घेत आहे.
या डकैतिचा छडा लावण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड पोलिसांची पथके विविध ठिकाणी कार्यरत झाली होती. त्यात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर चव्हाण, दीपक घोरपडे, महेश पाटील, राजू कांबळे, हंबीर अतिग्रे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्णायक भूमिका बजावली.
No comments:
Post a Comment