हेरे गावठाण मधील २९० प्लॉट नावावर करण्यास टाळाटाळ, प्लॉट धारक रघुवीर शेलार यांचा उपोषणाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2025

हेरे गावठाण मधील २९० प्लॉट नावावर करण्यास टाळाटाळ, प्लॉट धारक रघुवीर शेलार यांचा उपोषणाचा इशारा

 

रघुवीर खंडोजी शेलार

चंदगड : सी एल वृत्तसेवा
   हेरे (ता. चंदगड) गावठाण मधील २९० प्लॉट गोरगरीब गरजू लोकांना पस्तीस वर्षांपूर्वी देण्यात आले होते. प्रत्यक्षात ते प्लॉट लाभार्थींच्या नावावर न झाल्यामुळे गोरगरीब प्लॉट धारक लाभापासून वंचित राहिले आहेत. प्रशासनाने या प्रश्नी गांभीर्याने दखल घेऊन १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जागा प्लॉट धारकांच्या नावे न केल्यास ३ फेब्रुवारी पासून तहसील कार्यालय चंदगड समोर प्लॉट धारकांसह आमरण उपोषणाचा इशारा पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते व प्लॉटचे एक लाभार्थी रघुवीर खंडोजी शेलार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
 सन १९८९ मध्ये हेरे येथील तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीने गोरगरीब गरजू कुटुंबांना गावठाण हद्दीतील प्रत्येकी दीड गुंठ्याचे प्लॉट दिले होते. तथापि शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे हे प्लॉट अद्याप लाभार्थींच्या नावावर झालेले नाहीत. नंतरच्या काळात त्याला राजकीय वळण देत प्रक्रिया रद्द करून प्लॉट धारकांना डावलण्याचा प्रयत्न काही मंडळींनी चालवला. परिणामी प्लॉट नावावर करून देण्याच्या कामात पुन्हा अडथळे निर्माण झाले. मधल्या काळात प्लॉट धारकांनी एकदा आंदोलन केले होते यावेळी प्लॉटवरील जमिनीत झालेली अतिक्रमणे हटवण्यात आली होती. पण प्लॉट नावावर केले नाही. गेल्या काही वर्षांत या २९० प्लॉट धारकांपैकी अनेक कुटुंबांना शासकीय घरकुले मंजूर झाली होती पण प्लॉट जमीन नावावर नसल्यामुळे ही घरकुले रद्द झाली व आलेला निधी परत गेला. याचा आर्थिक व मानसिक फटका प्लॉट धारकांना बसला व बसत आहे. गोरगरिबांना दिलेल्या प्लॉटची जमीन त्यांना न देता अन्य संस्थांच्या घशात घालण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळी करत आहेत. ही बाब गंभीर असल्यामुळे आपण आमरण उपोषण सुरू करणार आहोत असे रघुवीर शेलार यांनी सांगितले. निवेदनासोबत प्लॉट वितरणाच्या पूर्ण प्रक्रियेची कागदपत्रे सातबारा आदी सादर केला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून १ फेब्रुवारी पर्यंत न्याय न दिल्यास ३ फेब्रुवारी २०२५ पासून तहसील कार्यालय चंदगड समोर बीपी शुगर च्या गोळ्या वर्ज्य करून उपोषणास बसणार असल्याचा इशारा ७७ वर्षीय रघुवीर शेलार यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कोल्हापूर, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज, तहसीलदार चंदगड, नगर रचना अधिकारी कोल्हापूर व पोलीस निरीक्षक चंदगड यांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment