![]() |
डॉ. चंद्रकांत पोतदार |
चंदगड / प्रतिनिधी
अत्यंत हळुवार आणि संवेदनशील अशी कविता लिहिणारे तसेच सीमा भागात मराठी भाषेची चळवळ रुजविणारे, लिहिणाऱ्यांना बळ देणारे हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांची दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड झाली आहे. गेली पस्तीस वर्षे निष्ठेने कविता लिहिणाऱ्या कवीचा हा सन्मान झाल्याने मराठी काव्यविश्वात तसेच सीमा भागात आनंद होत आहे. कवी पोतदार यांचे मूळ गाव नेज,ता. हातकणंगले हे असून ते गेली 33 वर्षे हलकर्णी येथे मराठीचे अध्यापन करत आहेत . तीन कवितासंग्रह, पाच संपादने आणि पाच समीक्षा ग्रंथ असे साहित्य लेखन त्यांच्या नावावर आहे. कवितेविषयीची संवेदनशीलता आणि कवितेची प्रामाणिक निष्ठा विद्यार्थ्यांच्या मनात रुजवत लिहीत्या लेखकाला त्यांनी नेहमीच बळ दिले आहे. माचीगड ,कुद्रेमणी, आणि कारदगा येथील साहित्य संमेलनाचे बीजारोपण त्यांनी केले आहे. आज अनेक साहित्य संस्थांचे त्यांना पुरस्कार लाभले आहेत.शिवाय त्यांच्या कवितांचाही गौरव झाला आहे. येळूर येथील संमेलनात नुकताच त्यांच्या ' परिघाच्या रेषेवर ' या ग्रंथाला पुरस्कार प्रदान झाला आहे. मराठी कवितेत स्वतःचे वेगळेपण जपत गाव आणि शहर याच्या मधल्या तुटलेपणाची जाणीव त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. अंतर्मुखतेची जाणीव आणि मानवी नात्यांचे हळवेपण मांडणाऱ्या त्यांच्या कवितेची दखल घेत अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित कवी म्हणून पाचारण केले आहे. निमंत्रितांच्या कवी संमेलनातील निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक मा. गोपाळराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष मा.अशोकराव जाधव, उपाध्यक्ष मा.संजय पाटील, सचिव विशाल पाटील ,प्राचार्य डॉ.बी.डी.अजळकर, उपप्राचार्य प्रा . आर.बी. गावडे, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment