![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथे पोलिसांनी तपासासाठी आणलेले आरोपी |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील भर बाजारपेठेत असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून १८ लाख ७७ हजार ३०० रुपये लुटणाऱ्या राजस्थान मधील चार लुटारुंना कोल्हापूर पोलिसांनी मुंबई व राजस्थान येथून काल जेरबंद केले होते. त्यांची आज गुरुवार दिनांक १६ रोजी दुपारी कोवाड च्या आठवडी बाजारातून निट्टूर रोड वरील एटीएम परिसरात बेड्या लावून धिंड काढली.
यावेळी नागरिकांनी लुटारूंना पाहण्यासाठी गर्दी केली होती. तथापि पोलिसांनी त्यांची डोकी काळ्या पिशवीत बंद केल्यामुळे त्यांचे चेहरे लोकांना पाहता आले नाहीत.
दि ४/१/२०२५ रोजी रात्री एखाद्या हॉलीवुड चित्रपटात साजेल अशा पद्धतीने राजस्थानातील या चोरट्यांनी अक्कल हुशारीने हे एटीएम फोडून त्यातील सर्व रक्कम लुटली होती. गडहिंग्लज तालुक्याच्या हद्दीतून कोल्हापूर कडे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांच्या गाडीचा गडहिंग्लज पोलिसांनी थरारक पाठलाग केला. यावेळी पोलिसांच्या गाडीला ठोकरुन चोरटे पुढे पळाले पण त्यांची कार मध्येच बंद पडल्यामुळे गाडी व एटीएम फोडण्यासाठी आणलेले गॅस कटर व इतर हत्यारे गाडीत टाकून केवळ पैसे घेऊन ते पसार झाले. हेब्बाळ जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथे बंद अवस्थेत सापडलेल्या या गाडीच्या मालकाचा प्रथम शोध घेऊन चंदगड, गडहिंग्लज व कोल्हापूर पोलिसांनी चोरट्यांच्या गळ्याला फास आवळला. प्रथम मुंबई व त्यानंतर राजस्थान येथे जाऊन गुन्ह्यातील आरोपी तस्लीम इसाखान (वय २०), अली शेर जमालो खान (वय २९), तालीम पप्पू खान वय २८), अक्रम शाबू खान (वय २५) सर्व रा. छोटी मस्जिद, सामदिका, तालुका पहाडी, जिल्हा भरतपुर (राजस्थान) यांना अटक केले. चारही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीस 'तो मी नव्हेच स्टाईलने' उडवा उडवी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसी खात्यात दाखवत बोलते केले. या गुन्ह्यातील रोकड अद्याप पोलिसांच्या हाती लागली नसली तरी ते कुणाकडे आहेत याचा पाढा पोलिसांच्या ताब्यातील लुटारुंनी वाचला असल्याने लवकरच ही रक्कम मिळवण्यात पोलिसांना यश येईल असा विश्वास यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment