शिवनगे येथे आरोग्य शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2025

शिवनगे येथे आरोग्य शिबीर संपन्न

 

शिबीरावेळी रुग्णांना तपासताना डॉक्टर
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरा निमित्त शिवणगे (ता. चंदगड) येथे गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्थ संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून डॉ. विलास पाटील हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रा. यु. एस. पाटील यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. दयानंद पाटील, डॉ. शामराव पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. संतोष पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्घाटन म्हणून बोलताना डॉ. विलास पाटील म्हणाले, 'हल्लीचा काळ इतका धावपळीचा, दगदगीचा, अडीअडचणीचा, संघर्षाचा झाला आहे की प्रत्येकाला स्वतःच्या तब्येतीकडे बघायला सुद्धा वेळ नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी त व्यस्त दिसत आहेत. वेळेवर जेवण नाही झोप नाही किंवा कोणत्याही प्रकारची काळजी नाही, यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होताना पहावयास मिळत आहेत. म्हणून आजारी पडण्या अगोदर आजारी पडू नये याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे.'
    या शिबिरामध्ये केदारी रेडेकर महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी पोटाचे विकार, मूत्रविकार, हाडांचे विकार, त्वचारोग, प्रोस्टेट, हर्निया, थायरॉईड, मधुमेह या आजारांच्या रुग्णावर उपचार केले. या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला या वैद्यकीय शिबिरासाठी शिवणगे ग्रामस्थांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभला. यावेळी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, उपप्राचार्य प्रा. आर. बी. गावडे, प्राध्यापक वर्ग, ग्रामस्थ एन. एस. एस. चे सर्व पदाधिकारी स्वयंसेवक व आदी मंडळी उपस्थित होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाने सहकार्य केल्याबद्दल दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी सर्व डॉक्टर व त्यांच्या स्टाफचे तसेच शिवणगे गावातील ग्रामस्थांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment