कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
ऐतिहासिक किल्ले पारगड वर पौष महिन्याच्या पौर्णिमेला दि ११/१/२०२५ रोजी अपूर्व उत्साहात 'ढाला' उत्सवाची सांगता झाली. आठ दिवस चालणाऱ्या या पारंपरिक उत्सवासाठी विविध ठिकाणी दूरवर राहणाऱ्या "आम्ही राहिलो शहरी तरी आमची श्रद्धा, निष्ठा आणि आत्मा किल्ल्यावरी" म्हणत जमलेल्या लेकी, सुनांच्या उपस्थितीने गडावर अक्षरशः चैतन्यमय वातावरण पसरले होते. राष्ट्रमाता जिजाऊ महिला मंडळ पारगड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
तंटामुक्त कमिटी पारगड, नामखोल, मिरवेल चे अध्यक्ष रघुवीर खंडोजी शेलार यांनी गावातील वयोवृद्ध आजी श्रीमती सरस्वती बाबाजी नांगरे यांच्या माध्यमातून "लेकिंनु, सुनांनु, नातींनु शिवाजी महाराजांनी चंद्र, सूर्य असेपर्यंत गड जागतो ठेया म्हणांन आदेश दिला, पूर्वजांनी वचन दिला, त्याचा पालन करा बयानू...!" अशा आपल्या बोलीभाषेतून घातलेल्या या हाकेला उदंड प्रतिसाद देत पोरीबाळींनी गडावर हजेरी लावली.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील जंगल परिसरातील गावांत वनदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी पौष महिन्यातील शुद्ध नवमी ते पौर्णिमे पर्यंत आठ-दहा दिवस हा उत्सव चालतो. रोज रात्री वनदेवतेचे पूजन व तिला प्रसन्न करून घेण्यासाठी महिला पारंपारिक गीतांसह फेर धरून नृत्य करतात. यावेळी काही मुले व महिला वन्य प्राणी बनून शिकार व शिकारी खेळ खेळतात. देवीला नैवेद्य दाखवला जातो, अखेरच्या दिवशी गावातील सर्व महिला एकत्र येत सर्वांसाठी जेवण बनवतात.
'ढाला' हा शेकडो वर्षांपासून चालत आलेला पारंपरिक उत्सव जंगल-संस्कृती संवर्धनतील एक अविभाज्य भाग आहे. आधुनिक जीवनशैलीत लोप पावत चाललेल्या अशा उत्सवांचे जतन करण्यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न झाले पाहिजे.
यावेळी विविध पारंपरिक गीतांसह 'शेव गो शेव, गड आमचा न्हये म्हणणाऱ्यांच्या पोटावर पाय ठेय....!' असे साकडे महिलांनी वनदेवतेसमोर मांडले. यावेळी पारगडसह नजीकच्या नामखोल, मिरवेल या गावातील महिलांनी गडावर उपस्थित राहून उत्सवात सहभाग घेतला.
अशा पारंपारिक उत्सव प्रसंगी तालुक्यातील वन विभाग तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून जंगल परिसरातील रहिवाशांच्या समस्या जाणून त्या शासनापर्यंत पोहोचवण्याची गरज जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment