सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेची ऐतिहासिक पारगड व तिलारीनगरला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2025

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेची ऐतिहासिक पारगड व तिलारीनगरला भेट


चंदगड : सी एल वृत्तसेवा
   चंदगड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना व विरंगुळा केंद्राच्या वतीने तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी ऐतिहासिक किल्ले पारगड व तिलारीनगर परिसराला भेट दिली. संघटनेचे अध्यक्ष शि ल होणगेकर व विरंगुळा केंद्र अध्यक्ष वसंतराव जोशीलकर यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमात ६० पेक्षा अधिक शिक्षक, शिक्षिका यांनी सहभाग घेऊन ऐतिहासिक माहिती जाणून घेत निसर्ग सानिध्याचा आनंद लुटला.
किल्ले पारगड येथे सुभेदार रायबा मालुसरे यांच्या स्मारक स्थळी मालुसरे यांचे वंशज सुनील मालुसरे यांचा सन्मान करण्यात आला.

   पारगड किल्ल्याच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर सर्वांनी पारगडचे पहिले किल्लेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायाजी उर्फ रायबा मालुसरे यांच्या जगातील पहिल्या स्मारकाला भेट दिली. या ठिकाणी तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज सुनील मालुसरे यांचा संघटनेच्या वतीने यथोचित सन्मान केला. दुर्ग सेवक प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेतलेल्या स्मारक सुशोभीकरण कार्यासाठी देणगी म्हणून रोख रुपये ५५५५/-  सुपूर्द केले. यावेळी चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी शिवरायांच्या हस्ते झालेली गडाची निर्मिती, गडाचे शिवकालीन तसेच ब्रिटिश व पोर्तुगीज कालीन महत्त्व, रायबा मालुसरे यांच्या कार्याचा इतिहास, शिवरायांनी सन १६७६ मध्ये गडाच्या निर्मितीनंतर "चंद्रसूर्य असेपर्यंत जड जागता ठेवा." या आदेशाची गेली साडेतीनशे वर्षे प्राणपणाने जपणूक करणारे येथील मावळे याबद्दल माहिती दिली. यावेळी सिंहगड लढाईतील उदयभान रजपूत याचा कर्दनकाळ 'शेलार मामा' यांचे वंशज रघुवीर शेलार यांच्या घरी जाऊन त्यांचाही यथोचित सन्मान केला. 
  याशिवाय गडावरील भगवती- भवानी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, हनुमान मंदिर, तोफा, महादेव मंदिर, तटबंदी, माळवे बुरुज, शेलार बुरुज, गडावरील ऐतिहासिक गणेश, गुंजन, फाटक व महादेव तलाव आदी ठिकाणे व निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर नजरेत साठवून घेतला.
  हेरे पारगड मार्गावरील कण्वेश्वर व रामघाट परिसर पाहून सायंकाळी कोदाळी येथील माऊली मंदिर तसेच तिलारी- दोडामार्ग घाटावरील सर्च पॉईंट परिसराला भेट दिली. माऊली मंदिरात जानेवारी महिन्यात वाढदिवस असलेले तसेच नजीकच्या काळातील पुरस्कार प्राप्त शिक्षिका, शिक्षक व त्यांच्या पत्नींचा शुभेच्छा व गौरव करण्यात आला. यावेळी झालेल्या गायन नृत्य कार्यक्रमात टी जे पाटील, पा क गावडा, सुनीता देसाई, श्रद्धा संभाजीचे, अर्चना शिंदे, वसंत जोशीलकर आदींनी सहभाग घेतला. सेवानिवृत्त विस्ताराधिकारी एम टी कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment