चंदगड : सी एल वृत्तसेवा
सावंतवाडी आगाराची सावंतवाडी, आंबोली, चौकुळ, इसापूर व्हाया पारगड, पाटणे फाटा बेळगाव बस सुरू करावी अशी मागणी मार्गावरील प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रवाशांच्या वतीने किल्ले पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील विभाग नियंत्रक यांना नुकतेच दिले.
गेल्या काही वर्षात हेरे ते पारगड व बेळगाव ते वेंगुर्ला या दोन राज्यमार्गांना जोडणाऱ्या इसापूर ते चौकूळ मार्गे अंबोली या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. वरील मार्गावरून सावंतवाडी आगाराची एसटी सुरू करण्याचे नियोजन झाले होते. तथापि कोरोनामुळे पुढील कार्यवाही रेंगाळली होती. सद्यःस्थितीत रस्ता चांगला असून याबाबतचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्रही निवेदनासोबत जोडण्यात आले आहे अशी माहिती रघुवीर शेलार यांनी दिली.
ही बस सुरू झाल्यास कोकणातून तसेच आंबोली येथे आलेले पर्यटक ऐतिहासिक किल्ले पारगडला सहज भेट देऊ शकतात. यापूर्वी आंबोली ते पारगड हे अंतर चंदगड मार्गे सुमारे ६५ किलोमीटर इतके होते. या रस्त्यामुळे आता ते केवळ १०-१५ किलोमीटर इतके राहिले आहे. या बस मुळे मार्गावरील आंबोली, चौकूळ, कुंभवडे, ईसापुर, पारगड, नामखोल, तेरवण, रामघाट, वाघोत्रे, गुडवळे, हेरे, मोटनवाडी, पाटणे, कलिवडे, जंगमहट्टी, पाटणे फाटा ते बेळगाव पर्यंतच्या प्रवाशांची सुविधा होणार असून मार्गावरील पारगड व आंबोली या पर्यटन केंद्रांना भेटी देणे सहज शक्य होणार आहे. या निवेदनाची प्रत चंदगडचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील व सावंतवाडी चे आमदार तथा माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आली आहे. दरम्यान बस सुरू करण्याबाबत कणकवली येथील विभाग नियंत्रक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असे श्री. शेलार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment