गव्याच्या हल्ल्यात दुंडगे येथील शेतकरी गंभीर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2025

गव्याच्या हल्ल्यात दुंडगे येथील शेतकरी गंभीर जखमी

गणपती जोतिबा कोकितकर (जखमी शेतकरी)

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   दुंडगे (ता. चंदगड) येथे रान गव्याच्या  हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला. गणपती जोतिबा कोकितकर (वय ५३) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच  पाटणे वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून जखमी शेतकऱ्याला वैद्यकीय उपचारासाठी पाठवले.
   वनविभाग व घटनास्थळावरून याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी,  दुंडगे गावाच्या हद्दीत चिंचणे कामेवाडी परिसरातील पिपळी काटे नावाच्या शेतात गणपती यांच्या शेतातील ऊस तोडणीसाठी  गावातील टोळी आली होती. यावेळी त्यांच्यासोबत कोकितकर गेले होते. दुपारी पावणे चारच्या सुमारास ऊसाजवळ लपलेल्या रान गव्याने त्यांच्यावर प्राणघातकहल्ला केला. यात त्यांच्या हात व मांडीला गंभीर दुखापत होऊन जबरदस्त मुका मार बसला आहे. ऊस तोडणी टोळीतील लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे गळ्याच्या तावडीतून त्यांची जिवंत सुटका झाली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे पाठवण्यात आले असून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.
   पाटणे विभागाचे कर्तव्यदक्ष वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी वनपाल जे आर डिसोजा, वनरक्षक जी ए रावळेवाड, वन कर्मचारी विश्वनाथ नार्वेकर आदी पथकासोबत परिसराची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. यावेळी पंच म्हणून उपसरपंच लक्ष्मण गणपती पाटील, रामा सुतार, संग्राम देसाई, ऊस तोडणी टोळीचे मुकादम गजानन बामणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment