![]() |
श्रीफळ वाढवून पायाभरणी शुभारंभ करताना उपसरपंच संभाजी पाटील, सरपंच छाया जोशी, राजाराम जोशी व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेतील विस्तारित पाणीसाठा टाकीचे भूमिपूजन व पायाभरणी समारंभ नुकताच संपन्न झाला. ६० हजार लिटर क्षमतेच्या या पाणी टाकीचे सरपंच सौ छाया जोशी दांपत्याच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले. उपसरपंच संभाजी पाटील व सर्व सदस्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आला.
कालकुंद्री येथे पहिली नळ पाणी योजना सन १९७७-७८ मध्ये तत्कालीन सरपंच एन के पाटील व उपसरपंच वैजनाथ निळकंठ पाटील यांच्या पुढाकाराने गावाच्या दक्षिणेकडील गौळदेव टेकडीवर असलेल्या ऐतिहासिक सय्यद तळ्यातून राबवण्यात आली होती. योजनेचे कागल येथील ठेकेदार बाळकृष्ण व विजय सनगर बंधूनी केलेल्या काळा कातळ फोडून केलेले पाईपलाईन व टाकीचे काम आजही शाबूत आहे. गावापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकडीवरून सायफन पद्धतीने येणाऱ्या पाण्याचा स्रोत ४६ वर्षानंतर आजही ग्रामस्थांची तहान भागवत आहे. पावसाळ्यात ताम्रपर्णी नदीला येणाऱ्या महापुराच्या काळात किंवा खंडित वीजपुरवठ्याच्या प्रसंगी हीच योजना आजही ग्रामस्थांच्या मदतीला धावून येते. कालकुंद्री गाव उंच टेकडीवर वसलेला आहे. गावातील सर्वात उंच ठिकाणी जुनी पाण्याची टाकी बांधण्यात आली असून तलावातील पाणी सायफन पद्धतीने पद्धतीने येऊन या टाकीत पडते. त्यामुळे या पाण्याच्या वितरणाला सुद्धा मोटर पंप किंवा वीज बिलाचा कोणताही खर्च नाही. उन्हाळ्यात या योजनेचे पाणी कमी पडत असल्यामुळे काही वर्षांपूर्वी दुसरी योजना राबवण्यात आली.
ग्राम विस्तारामुळे दुसऱ्या योजनेतील पाणीही अपुरे पडत असल्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत तिसरी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतील बहुतांशी काम पूर्ण झाले असून पाणी साठवण्यासाठी सध्या सावरकर नगर परिसरात बांधण्यात येत असलेली ही गावातील चौथी पाणी टाकी ठरणार आहे.
टाकी भूमिपूजन प्रसंगी सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, सदस्य विलास शेठजी, विठ्ठल पाटील, अझरुद्दीन शेख, प्रशांत मुतकेकर, सदस्या विजया कांबळे, स्वागता कदम, गीता नाईक, गायत्री पाटील, गीता अनंत पाटील यांच्यासह ग्रामसेवक दत्ता नाईक, पोलीस पाटील संगीता कोळी, सामाजिक कार्यकर्ते विनोद अशोक पाटील, आर आर पाटील, भरमू पाटील, राजाराम जोशी, सेवा संस्था चेअरमन अशोक पाटील, अरविंद कोकितकर, सप्ताह कमिटी अध्यक्ष शंकर पाटील, शिवाजी जाधव, दुद्धाप्पा पाटील, माजी सैनिक शरद जोशी, विष्णू पाटील आदींसह कर्मचारी सागर पाटील, उदय सुतार, महादेव लोहार, नरसु कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment