स्टोन क्रशर व वाहनांमुळे ग्रामस्थ हैराण, अवैध उत्खनन तात्काळ बंद करण्याची मांडेदुर्ग, सुंडी ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2025

स्टोन क्रशर व वाहनांमुळे ग्रामस्थ हैराण, अवैध उत्खनन तात्काळ बंद करण्याची मांडेदुर्ग, सुंडी ग्रामस्थांची मागणी

 

पर्यावरणाचा नाश करणाऱ्या खडीमशीन तात्काळ बंद कराव्यात या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार यांना देतांना मांडेदुर्गचे ग्रामस्थ

चंदगड : सी एल वृत्तसेवा

     मांडेदुर्ग व सुंडी गावांच्या दरम्यान सुरू असलेल्या दोन अवैध खडीमशीन मुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांचे जगणे मुश्किल झाले आहे. या दोन्ही मशीन तात्काळ बंद करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार चंदगड यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली आहे.

    या दोन्ही मशीनला ग्रामसभेत तीव्र विरोध झाला होता. तसे निवेदन तहसील कार्यालयाला देऊनही विरोध डावलून खडीमशीन सुरू करण्यात आलेल्या आहेत. गावाला विचारात न घेता पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या क्रशर मशीन  राजरोस सुरू आहेत. त्या कायमस्वरूपी बंद होईपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

    क्रशर गावाजवळ असल्याने तेथील घरघर व ब्लास्टिंग मुळे घरे व इमारतींना गंभीर धोका निर्माण झाला आहे. घरांच्या भिंतींना तडे जात आहेत. खडी घेऊन वाहतूक करणारे ५० टनी वजनाचे डंपर रात्रंदिवस गावच्या मध्यवस्तीतून धुळीचे लोट उडवत जात असतात. परिणामी घरात व कौलांवर धुळीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.  नागरिक श्वसन व दम्याच्या आजारामुळे त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी वाहने व मशिनच्या आवाजाने गावकाऱ्यांची झोप उडवली आहे. त्यांना निद्रानाशाबरोबरच मानसिक संतुलन बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. खडी वाहतूक करणाऱ्या गाड्या केंद्रीय प्राथमिक शाळे जवळून येजा करत असल्याने येथील विद्यार्थ्यांची सुरक्षा व आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून या आवाजामुळे शिक्षकांना शाळेत अध्यापन करणे मुश्किल झाले आहे. आयुष्यभर राबून शेतकरी पैनपै जमवून व कर्ज काढून आपल्या स्वप्नातील एक घर बांधतो. पोटाला चिमटा लावून कर्ज फेडतो. त्याच  स्वप्नांना डोळ्या देखत तडे जात आहेत. 

     ब्लास्टिंग च्या हादऱ्यामुळे गावातील २०० बायोगॅस लिकेज झालेले आहेत. त्या विरोधात काही ग्रामस्थांनी वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवल्या असता मुजोर मालकांने धमकी देत कोर्टात केस दाखल केली आहे. पाणलोट धरणाजवळच क्रशर मशीन असल्याने धरणालाही धोका निर्माण झाला आहे. जवळच वनक्षेत्र आहे. प्रशरच्या आवाजामुळे प्राणी बिथरले असून वन्यप्राण्याना त्रास होऊन ते शेतीचे नुकसान करत आहेत. क्रशर मशीनमधून निघणाऱ्या धुळीमुळे भात, नाचणी, काजू व जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी अवैध स्टोन क्रशर कायम स्वरूप बंद करून गावाची होणारी राखरांगोळी थांबवावी. क्रशर मालकावर कारवाई न झाल्यास दि. ७ फेब्रुवारी पासून रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर  सरपंच विनायक ल.कांबळे, उपसरपंच गणपती शं. पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष  बी. एम. पाटील, सुनील पाटील, भरमाणा नौकुडकर, फकीरा शिंदे, पुंडलिक पाटील, दिपक पवार, जिवन कांबळे, मारूती यल्लारी आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 

No comments:

Post a Comment