चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"हिंदू धर्म खऱ्या अर्थाने सहिष्णू आहे, परंतु सहिष्णुतेचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी `दया तिचे नाव भूतांचे पालन, आणिक निर्दालन कंटकांचे' असे सांगितले आहे. दुष्टांना शासन करणे म्हणजे त्यांच्या त्रासापासून सज्जनांचे रक्षण करणे असाच सरळ अर्थ होतो." असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहधर्मजागरण संयोजक मिलिंदजी वाईकर यांनी केले. कोवाड (ता. चंदगड) येथील सघोष पथसंचलन व जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तालुका संघचालक आशिष दाणी, जिल्हा कार्यवाह डॉ. दत्तात्रय गर्गे यांच्यासह इतर जिल्हा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मिलिंद वाईकर पुढे म्हणाले की, हिंदूंची बहुसंख्या हिच भारताची शक्ती आहे. जनसंख्या असंतुलन हे राष्ट्रीय संकट आहे. धर्मांतरण हे देशविरोधातील षडयंत्र आहे. धर्मांतरण झाल्याने नामांतरण होते, भाषांतरण होते, विचारांतरण होते, वेषांतरण होते आणि हिंदूंचे स्थलांतरण होते असे इतिहास सांगतो. खऱ्या इतिहासाचे वाचन केले की प्रत्येक आक्रमणाच्या पाठीमागे धार्मिक कारण होते, हे अगदी उघडपणे दिसून येते. त्यामुळे आपल्या देशाला एकता, अनुशासन, शिस्त, देशभक्ती व संस्कारांची नितांत आवश्यकता आहे. जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जी अनेक सेवा कार्ये केलेली आहेत. ती विचारात घेऊन आपणही देश हिताला प्रथम प्राधान्य द्यायला हवे.
यावेळी कार्यक्रमास अनेक स्वयंसेवक, नागरिक, कार्यकर्ते, हितचिंतक यांची लक्षणीय उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment