गोवा मुक्ती संग्राम लढ्यात बेळगाव सह सीमा भागाचे मोठे योगदान...! रमाकांत खलप, बेळगाव येथे 'राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलनात' विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2025

गोवा मुक्ती संग्राम लढ्यात बेळगाव सह सीमा भागाचे मोठे योगदान...! रमाकांत खलप, बेळगाव येथे 'राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलनात' विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

 

बेळगाव येथील राष्ट्रीय कला संस्कृती संमेलनात बोलताना  माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप

चंदगड : सी एल वृत्तसेवा

       गोवा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात बेळगाव सह सीमा भाग व नजीकच्या चंदगड तालुक्याचे मोठे योगदान लाभले होते. असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते गोव्याचे माजी खासदार व माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी काढले. ते एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशन आयोजित 'राष्ट्रीय कला संस्कृती संमेलन बेळगाव २०२५' चे उद्घाटक म्हणून बोलत होते. बेळगावचे माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी अध्यक्षस्थानी होते.

दीप प्रज्वलन करताना निवृत्त आर्मी अधिकारी सुभेदार मेजर गजानन चव्हाण 

       स्वागताध्यक्ष जीवन संघर्ष फौंडेशन बेळगावचे अध्यक्ष, बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना अध्यक्ष तसेच चित्रपट निर्माता, दिग्दर्शक डॉ. गणपत पाटील यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र शासनाचा युवक पुरस्कार विजेते डॉक्टर बी एन खरात यांनी केले. यावेळी पुढे बोलताना माजी केंद्रीय मंत्री खलप म्हणाले ज्याप्रमाणे गोवा मुक्तिसंग्रामात बेळगाव व सीमा भागात चा सक्रिय सहभाग होता तसा तो स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा होता. भारत देश इतका समृद्ध आहे की दीडशे वर्षे इंग्रजांनी भारताला जे लुटले ते आम्ही त्यांना दिलेली भिक समजतो. अमेरिका स्वतःला जागतिक महासत्ता समजत असली तरी अमेरिकेला महासत्ता बनवणारे आपल्या देशातीलच तरुणच आहेत. जे आज तिथे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आपण ६० वर्षांपूर्वी याच बेळगाव बेळगावातील कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. यावेळी त्यांनी बेळगाव गावातील कॉलेज जीवन तसेच गोवा मुक्ती लढ्यातील  पोर्तुगीज सैनिकांनी मी समजून माझ्या भावालाच पकडून नेले होते. असे अनेक प्रसंग सांगितले. महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा कायदा आपण केंद्रीय मंत्री असताना केल्याची आठवण त्यांनी करून दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी १५०० रुपयाला भाळल्या आणि ३३ टक्के आरक्षण देणाऱ्यांना विसरल्या! अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केली.

पत्रकार नंदकुमार ढेरे यांना समाज जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना मान्यवर

       कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निवृत सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना व त्यांच्या गावात राहणाऱ्या कुटुंबीयांना देशातील नागरिकांनी पाठबळ दिल्यास युद्धाच्या वेळी दुप्पट ताकद मिळते असे सांगितले. त्यांनी आपल्या ३४ वर्षातील आर्मी सेवेतील अनेक अनुभवांसह दक्षिण अफ्रिकेत कांगो देशात संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना तेथे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेचिराख होणारी घरे, झाडे, प्राणी, माणसे व त्यांना वाचण्यासाठी धडपडणारी इंडियन आर्मी, तसेच  तेथील बंडखोर दहशतवाद्यांचा मुकाबला करतानाचे थरारक प्रसंग सांगितले. यावेळी बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर, चित्रपट अभिनेते व निर्माता चंद्रकांत लोंढे, कोल्हापूर येथील उद्योजिका स्वामी एंटरप्राइजेसच्या मालक पूनम मोरे यांनी मनोगते व्यक्त केली.

      लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) बेळगाव येथे पार पडलेल्या कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध गायिका मीरा आजगावकर यांच्या श्री गणेश स्तवनाने झाली. यावेळी दूरदर्शन अभिनेत्री व नृत्यांगना रिया रामनिंग पाटील यांच्या बहारदार लावणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या राष्ट्रीय कला संस्कृती संमेलनाच्या माध्यमातून समाजातील राजकीय, क्रीडा, शिक्षण, पत्रकारिता, उद्योग क्षेत्रातील ५० मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कारेकर यांनी केले. यावेळी चंदगड  पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, कृष्णा बामणे,  गोपाळ पाटील (सिंधुदुर्ग) प्रशांत (बेळगाव) आदींसह महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील शेकडो मान्यवरांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment