सैनिक कुटुंबांच्या अपार्टमेंट मध्ये होणार 'बार'...! रहिवाशी व मनसेचा आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2025

सैनिक कुटुंबांच्या अपार्टमेंट मध्ये होणार 'बार'...! रहिवाशी व मनसेचा आंदोलनाचा इशारा

 

भडगाव रोड गडहिंग्लज येथील आनंद विहार अपार्टमेंट मध्ये होणाऱ्या नियोजित बारला विरोध करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांना निवेदन देताना मनसेचे पदाधिकारी व अपार्टमेंट मधील नागरिक.

चंदगड : सी एल वृत्तसेवा
      गडहिंग्लज- भडगाव रोड येथील आनंद विहार अपार्टमेंट मध्ये होणाऱ्या नियोजित बारला येथील रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. संबंधित बिल्डरच्या नियोजित बारमुळे अपार्टमेंटमधील सुरक्षितता पूर्णपणे धोक्यात येणार आहे. येथे वास्तव्यास असणारी बहुतांश कुटुंबे ही आर्मीतील सैनिक व अधिकारी तसेच वीर नारी, वीर पत्नी यांची आहेत. त्यामुळे  शक्यतो येथे महिलांचे वास्तव्य जास्त असते. अशा ठिकाणी दारुड्यांची वर्दळ सुरु झाली तर येथे या कुटुंबांना राहणे मुश्किल होणार आहे. अशा परिस्थितीत गंभीर घटना घडू शकतात. त्यामुळे येथे होणाऱ्या बारला परवानगी देऊ नये. अशा आशयाचे निवेदन गडहिंग्लज येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांना गडहिंग्लज तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिली आहे. हे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देताना नागेश चौगुले यांच्यासह मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनायक आवळे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, शहर अध्यक्ष केप्पन कोरी, पी डी पाटील, संग्राम सावंत, कुमार पाटील, उज्वला दळवी आदींसह आनंद विहार मधील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
  या निवेदनाची  योग्य ती दखल घेऊन संबंधित विभागाने बारला दिलेली परवानगी रद्द करुन नियोजित बार अन्यत्र हलवावा. अन्यथा रहिवाशी नागरिकां सह तीव्र आंदोलन करून मनसे स्टाईल ने खळ्ळऽऽ खटॅक आंदोलन केले जाईल. असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment