कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील मौजे कार्वे प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थीनी कु. श्रेया लक्ष्मण पाटील हिची राज्यस्तरीय वीरगाथा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील तब्बल ६ लाख ९ हजार ७९० विद्यार्थ्यांतून तिची निवड करण्यात आली आहे. चंदगड तालुक्याला अशा प्रकारचा बहुमान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा पुरस्कार २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे येथील शासकीय ध्वजारोहण प्रसंगी दिला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राज्यातील इयत्ता तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी व अकरावी ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी वीर गाथा प्रकल्प अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. चारही गटातील प्रत्येकी २० स्पर्धकांना नामांकन दिले होते. त्यातून अंतिम आठ स्पर्धकांची म्हणजे प्रत्येक गटातील प्रथम २ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड घोषित करण्यात आली. या स्पर्धेच्या सहावी ते आठवी गटात श्रेया हिने प्रथम क्रमांक मिळवला होता. एका सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगीने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. या आठ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन मंडळ पुणे मार्फत पुणे येथील प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
पुणे येथील कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक राहुल रेखावर यांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन तिच्यासह आई-वडील व शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. याकामी तिला मुख्याध्यापक संतान लोबो, अध्यापिका सीमा नांदवडेकर, नंदा नाईक, अध्यापक आनंदा कांबळे, शिवाजी पाटील, शिवाजी यळूरकर, सट्टूप्पा लोहार यांचे मार्गदर्शन तर गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील विस्तार अधिकारी सुमन सुभेदार, केंद्रप्रमुख आर एस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांचे प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment