चंदगड : सी एल वृत्तसेवा
वरळी- मुंबई विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी नुकतीच चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगडला भेट दिली. गडकऱ्यांसमवेत त्यांनी संपूर्ण किल्ला फिरून पाहणी केली. यानंतर भवानी मंदिर येथे किल्ले पारगड व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक पारगड जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष कन्होबा माळवे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी गडावरील पाण्याचा प्रश्न, अंतर्गत रस्ते, भवानी मंदिर समोरील अर्धवट बांधण्यात आलेली धक्का भिंत, पारगड- मोर्ले घाट रस्त्याचे रखडलेले काम, आरोग्य सुविधा याकडे आमदारांचे लक्ष वेधून या कामी पाठपुरावा करण्याची विनंती केली.
यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी वरील सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्याबरोबरच गड संवर्धन साठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पारगड वासीयांच्या रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील याबाबतच्या आशा उंचावल्या आहेत. आपल्या प्रयत्नातून सन २०१५-१६ मध्ये पारगड गावठाण प्रश्न मार्गी लागला असून घरे व परडी सातबारा दप्तरी रहिवाशांची नावे नोंद झाली. हा प्रश्न मार्गी लावल्याने किल्ल्यावरील मावळ्यांना न्याय मिळाल्याचे समाधान आपल्याला आहे. पारगडच्या विकासासाठी मी कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कक्ष वरळी चे प्रमुख कृष्णकांत शिंदे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संभाजी पाटील व युवराज पवार (आजरा), पारगड येथील ९८ वर्षीय जेष्ठ नागरिक राघोबा दुलाजी शिंदे, यांच्यासह चंदगड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार, विठ्ठल शिंदे, शांताराम आढाव, प्रकाश चिरमुरे, नारायण गडकरी, रामचंद्र नांगरे, कृष्णकांत शिंदे, धोंडीबा जांभळे यांनी पारगड व पंचक्रोशीतील समस्या मांडल्या.
No comments:
Post a Comment